रत्नागिरी | प्रतिनिधी : कनकाडी-शिंदेवाडी (ता. संगमेश्वर) येथील वृद्धाला बैलाने मारले. जखमी अवस्थेत त्याला साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सुधाकर तुकाराम चव्हाण ( ६०, रा. कनकाडी-शिंदेवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवार 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास घडली. सुधाकर चव्हाण बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास बैल चरविण्यासाठी घेऊन गेले होते. रात्री आठ वाजेपर्यत परत आले नाही म्हणून त्यांचा भाऊ मनोहर चव्हाण बघण्यासाठी गेले असता त्यांना सुधाकर हे घऱाच्या मागील देवमळी येथील पायवाटेवर जखमी अवस्थेत दिसले. त्यांच्या मानेला जखम झाली होती. त्यांना विचारले असता त्याने हाताच्या दोन बोटांच्या इशाऱ्याने बैलाने शिंगाने मारले असल्याचे खुणवले. त्यांना तातडीने उपचारासाठी साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता रात्री साडेबाराच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.












