एसटीतील वायफाय सेवा बंद कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात

खेड(प्रतिनिधी) सध्या दळणवळणामध्येही स्पर्धा चालू असून खाजगी वाहनांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. या स्पर्धेमध्ये एसटी महामंडळही कुठे कमी नाही. एसटी नेही आपल्या गाड्यांमध्ये अत्याधुनिक गाड्यांचा ताफा आणला आहे. त्यामध्ये डिजिटल बोर्ड, वायफाय सेवा, आरामदायी आसने दिली होती. मात्र कोट्यवधीचा खर्च करून बसवलेली वायफाय सेवा काही काळातच बंद पडलेली दिसून येत आहेत तर डिजिटल बोर्डाचे साधे बोर्ड दिसून येत आहे. त्यामुळे एसटीचाकोटयवधीचा खर्च वाया गेलेला आहे.

दळणवळणाच्या साधनांपैकी विमान, रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत. खाजगी बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशासाठी सुविधा कमी आहेत. त्यामुळे महामंडळाने तीन वर्षापूर्वी बसमध्ये वायफाय सुविधा सुरू केली. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये मोफत मनोरंजनासाठी वायफायची सोय उपलब्ध झाली होती. परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून एसटीमधील वायफाय सुविधा बंद असल्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशीवर्गांमधून नाराजी व्यक्त केली जात असून कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे. तसेच डीजिटल बोर्डही दिसेनासे झाले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाकडून तीन वर्षांपूर्वी प्रत्येक बसमध्ये वायफायची सुविधा करून दिलीहोती. त्यामुळे स्मार्ट फोनधारकांसाठी बसमध्ये मनोरंजनाची सोय झाली होती. मात्र, प्रवाशांनाया बाबीची साथ मर्यादीत ठरली. काही महिन्यातच वायफायचा बोजवारा उडाला. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेली ही सुविधा बंद पडली आहे.

विविध सुविधांचा बोजवारा

लांब पल्ल्याच्या बसमधील स्मार्टफोनधारक स्टोअर केलेले कार्यक्रम पाहून मनोरंजन करून घेत होते. यात बातम्या, चित्रपट, ध्वनीफीत गाणे, दिसणारे गाणे, कथा, कादंबरी किंवा एखाद्या पुस्तकाचे वाचन केले जात होते. त्याचप्रमाणे लहान बालकांसाठी कार्टून, व्हीडीओ गेम, कॉमिक्स बुक्सची सुविधा उपलब्ध होती. महिलासाठी सीरीयलची सुविधा होती. मात्र काही दिवसात या सुविधेचा बोजवारा उडाला. काही दिवसातच वायफाय नॉट रिचेबल झाले असल्याचे प्रवाशी वर्गामधून बोलले जात आहे.