इन्सुली एक्साइस ऑफिसला मनसेची धडक

बेकायदा दारू वाहतुकीवरून धरले धारेवर

बांदा | प्रवीण परब : गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेसुमार बेकायदा दारू वाहतुकी वरून मनसे पदाधिकाऱ्यांनी इन्सुली एक्साइज कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. विभागाच्या बेजबाबदार पणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई न केल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

दारू वाहतुकीवर होत असलेल्या दुर्लक्षामुळे होणारे दुष्परिणाम कथन करण्यात आले. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडेच गोवा बनावटीच्या विषारी दारूचा सुळसुळाट चालू आहे. आजची युवा पिढी स्वस्त मिळणाऱ्या दारूमुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्याच प्रमाणे कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने अवैध दारू व्यवसाय करणारे या आजच्या तरुण पिढी व विद्यार्थ्यांना वाहने तसेच खर्चाला पैसा देत या धंद्यात ओढत आहे याकडे लक्ष वेधण्यात आले.

आजची युवा पिढी व्यसनाधीन होत असल्याने त्यांच्या पालकांवर सुद्धा आपल्या मुलांची व्यसनाधीनता पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गेल्या वर्षीदारू धंद्याविरोधात डबे वाजवा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. गावागावातून व शहरातून चोरटी दारू आणून विकली जाते. त्याच्यावर मात्र कोठेही कारवाई होताना दिसत नाही असे सुनावण्यात आले.

गावागावातून तसेच शहरात चालणाऱ्या दारू व्यवसायाबाबत एक्साईज, पोलीस खाते, पोलीस पाटील, दक्षता समिती यांनी एकत्र येऊन या अवैध धंद्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा मनसे कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसैनिकानी दिला. वेळीच कारवाई करून चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या वाहतुकीला आळा घालू असे आश्वासन उपस्थित एक्साइज अधिकाऱ्याने मनसे शिष्टमंडळाला दिला.

यावेळी मनसे विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार, माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नाना सावंत, बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे, विजय जांभळे, माजी शाखा अध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, ग्रा. प. सदस्य आदेश सावंत, विद्यार्थीसेना जिल्हा सचिव निलेश देसाई, विद्यार्थीसेना शहराध्यक्ष स्वप्निल जाधव, रघुनाथ खोटलेकर, गिरगोल दिया, विद्यार्थीसेना तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक, रुपेश गुळेकर, सुनील नाईक, पंकज देसाई आदी उपस्थित होते.