सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाने वेधले होते लक्ष
चेअरमन प्रमोद गावडे यांची माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : हमीभावाने भात खरेदी करताना ई नोंदणी अडथळा निर्माण झाला त्यांना भात शासकीय हमीभावाने विक्री करण्याची संधी शासकीय स्तरावरून देण्यासाठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने दिलेल्या निवेदनाची दखल निवासी उपजिल्हाधिकारी यांनी घेतली असून कोकण आयुक्तांना याबाबत माहिती दिली आहे.
आधारभूत किंमत धान खरेदी योजना सन २०२३-२४ शेतकरी नोंदणी व खरेदी यामधील अडचणीबाबत खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देत शासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. याशिवाय पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी सभापती प्रमोद सावंत, तज्ज्ञ संचालक अभिमन्यू लोंढे, माजी उपसभापती विनायक दळवी,गजानन नाटेकर, आदी उपस्थित होते.
गतवर्षी पेक्षा यंदा हमीभावाने भात पीक नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच ई नोंदणी करताना नेटवर्क मध्ये अडथळा निर्माण झाला होता याकडे लक्ष द्यावे आणि शेतकऱी हमीभावापासून वंचित राहू नये म्हणून खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कोकण आयुक्तांना प्रस्ताव सादर करून कळविले असल्याचे खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना कळविले आहे. तसेच इ नोंदणीसाठी प्रयत्न केला पण नेटवर्क अभावी नोंदणी झाली नाही असे पुरावे असतील त्यांना भात हमीभावाने विक्री करण्याची संधी उपलब्ध होईल, अशी आशा बळावली आहे असे प्रमोद गावडे यांनी बोलताना सांगितले.










