सावंतवाडी । प्रतिनिधी : ठाकरे युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख गुणाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. लवकरच युवा सेना जिल्हाध्यक्षांकडे ते आपल्या पदाचा राजीनामा सादर करणार आहेत. दरम्यान, त्यांच्या या राजीनाम्यामुळे तालुक्यात ठाकरे युवा सेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
गुणाजी गावडे हे सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावचे सरपंच असून ते उबाठा सेनेचे निष्ठावंत मानले जातात. यापूर्वीही त्यांनी वेत्ये गावचे उपसरपंच तसेच युवा सेनेचे पदाधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. संघटनात्मक कामातही त्यांचा मोठा हातखंडा आहे. असे असताना त्यांनी अचानकपणे आपल्या युवा सेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचे सुतोवाच केल्यामुळे ठाकरे युवा सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, गुणाजी गावडे यांनी हा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला हे मात्र समजू शकले नाही. आता त्यांची पुढील राजकीय वाटचाल नेमकी कोणती असेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.









