
शिर्के प्रशालेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ना.रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती रुजवत खेळ, स्पर्धा परिक्षा, चांगली विचारधारा यांच्या त्यांच्यावर भडीमार करत राष्ट्राला अपेक्षित असलेली नवी पिढी घडविण्याचे काम शिर्के प्रशालेतील सर्व शिक्षक,मुख्याधापक, संस्थाचालक करत आहेत.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला घडविताना विद्यार्थ्यांवर वैयक्तील लक्ष देवून एक चांगला नागरिक आपण समाजाला कसा देवू याचा प्रयत्न शिर्के प्रशालेतील शिक्षकवर्ग करत आहे. शिर्के प्रशाला ज्ञानदानाचे विद्यापिठ असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेला ७५ वर्षे पूर्ण होऊन शाळेचा अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ ना.चव्हाण यांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत, संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतिश शेवडे, शिर्के प्रशालेच्या शालेय समितीचे प्रमुख अॅड. विजय साखळकर, माजी कार्याध्यक्ष अॅड.विलास पाटणे, सह. कार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर, शिर्के प्रशाला कनिष्ट महाविदयालय शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर, मुख्याध्यापक रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी ना.सामंत, ना.चव्हण यांच्या हस्ते अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. तर शाळेमार्फत सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सतिश शेवडे, अॅड.विलास पाटणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी बोलताना ना.चव्हाण पुढे म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया शालेतच मजबूत होते असतो. अशा वेळी पाया भक्कम करणारे हे शिक्षकच असतात. विद्यार्थी नेहमी शिक्षकांचे अनुकरण करत असतात. येथील शिक्षकांचे काम अतिषय उत्तम आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. हे येथील शिक्षकांच्या कामाची पोहचपावती आहे.
शासनाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकविण्याचे काम शिक्षकांचे असतेच मात्र त्यापुढे जाऊन आपली संस्कृती काय आहे. ती टिकविण्यासाठी काय केले पाहिजे, योगाचे महत्व काय आहे. हे येथील शिक्षक विद्यार्थ्यांना पटवून देत आहेत. विनोद मयेकर यांच्या सारखे क्रिडा शिक्षक १८ तास काम करुन विद्यार्थ्यांना घडवत आहेत.त्यामुळेच त्यांच्या विद्यार्थ्यांना शासनाचे महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विनोद मयेकर यांचे विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय खेळामध्ये चमकत आहेत. हे शाळेचे मोठे यश असल्याचे ना.चव्हाण यांनी सांगितले.
शाळाना सहकार्य करण्यात सरकार शंभर टक्के यशस्वी होवू शकत नाही. मात्र आपल्या मुलांना आवश्यक सोई-सुविधा देण्यासाठी संस्था, शिक्षक हे लोकसहभागातून मदत घेवून त्या सुविधा देण्याचे काम करत आहे. येथील माजी विद्यार्थी, सर्वसामान्य सहकार्य मिळविण्यात शिर्के प्रशालेच्या शिक्षकांना यश आल्याचे ना.चव्हाण यांनी सांगितले.
शिर्के प्रशालेने प्रत्येक क्षेत्रात चांगली कमागिरी केली आहे. शाळेचे विद्यार्थी आज राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. हे येथील शिक्षकांचे यश आहे. सरकारमार्फत जी मदत लागेल ती देण्यासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कटिबद्ध असल्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांसह निवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक,कर्मचारी, संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.











