उकडीचे मोदक, रस घावणे , बिरडाची ऊसळ, पुरण पोळीने केळीचे पान सजले
रश्मी परब आणि सागर गोहिल विवाह बंधनात
लक्ष्मी नारायण मंदीर प्रांगण शाही विवाह स्थळ
प्रभू सृष्टीत रंगली हळद आणि मेहंदी संगीत मैफिल
संतोष वायंगणकर
कुडाळ : दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीनारायण मंदिर वालावल परिसरात सुप्रसिद्ध अभिनेते मिलींद गुणाजी यांच्या सुपूत्राचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. या विवाहसोहळ्याचे व्यवस्थापन कणकवलीतील व्यावसायिक सुजित काणेकर यांनी उत्कृष्टरितीने केले होते. त्या विवाह सोहळ्याची चर्चा वर्षे-दोन वर्षे होत असतानाच नुकताच नेरूर येथील मोहन सहदेव परब यांची कन्या रश्मी आणि गुजरात येथील सागर गोविल यांचा विवाह सोहळा पार पडला. या शाही विवाह सोहळ्याचे व्यवस्थापनही सुजित काणेकर यांच्या ‘अल्फा इव्हेंट्स’ने केले. चार दिवस वालावल परिसरातील नेरूर-वालावल येथील प्रभूसृष्टीत परब-गोविल कुटुंबियांचे साखरपुडा, हळदी समारंभ, मेहंदी, संगीत मैफील हे सारे कार्यक्रम उत्सवी वातावरणात पार पडले. महाराष्ट्र व परदेशातून मिळून २०० पाहुणे या विवाह समारंभात सहभागी झाले होते.
या शाही सोहळ्यातील भोजनाच्या मेनूमध्येही सुजित काणेकर यांनी वैविध्यता राखली होती. यामध्ये पारंपरिक मालवणी जेवणासह पुरणपोळी, उकडीचे मोदक, मालपोवा-रबडी, आमरस, गुजाबजाम, भाजी, ओले काजूगर, उसळ, वालाचे बिरड, पनीर मटार, भेंडी, डोसाभाजी, काळा वाटाणा, फरसाण , व्हेज कटलेट, ओला वाटाणा करंजी, कोथंबिरी वडी, कांदा भजी, पालक भजी, मिनी बटाटा वडा, मिनी समोसा, आंबोळी-चटणी, साबुदाणा खिचडी, बटाटा पोहे, उपमा, फुलके , तांदळाची भाकरी, पालक पनीर पुलाव, मसाले भात, वरण-तुप, मसाला ताक, वांगी-बटाटा-सुरण-केळीची काप,आईस्क्रीम, नाचणी पापड, फेण्या, तांदुळ पापड, तसेच पावभाजी, पुलाव, मसाला पाव, खोबरावडी, पान विडा, कोकम सोडा विथ पुदिना अशी मालवणी आणि गुजराती खाद्य पदार्थांची रेलचेल होती. यावेळी दिलेले जेवण केळीच्या पानातून देण्यात आले. दरम्यान बऱ्याच गुजराथी महिलांनी रेसिपी विचारुन घेतल्या व जाताना येथील पदार्थ खरेदी केले.
पारंपरिक शहनाई वादन, स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, सहभागी पाहुण्यांना फेट्यांचा साज, तुतारी वादन यामुळे लग्नसोहळ्याला भारदस्तपणा आला. एकंदरित या शाही विवाह सोहळयामुळे स्थानिकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली एवढे मात्र निश्चित.











