गोवळकोटमध्ये प्रथमच भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन

चिपळूण :

चिपळूणमध्ये गेली अनेक वर्षे सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जय हिंद क्रीडा मंडळ, गोवळकोट या संस्थेच्यावतीने संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार दिनांक २३ एप्रिल रोजी भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गोवळकोट येथे प्रथमच अशा प्रकारची पालखी नृत्य स्पर्धा आयोजित केली जात असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही भव्य स्पर्धा रात्री ९ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण, गोवळकोट (शिंदेवाडी), चिपळूण येथे रंगणार आहे. जिल्हाभरातील विविध नामांकित नृत्यसंघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सादर होणारे जोशपूर्ण पालखी नृत्य, आकर्षक वेशभूषा आणि सादरीकरणातील समन्वय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

पालखी नृत्य ही आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख जपणारी लोककला असून, या स्पर्धेच्या माध्यमातून ती अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत असतानाच, युवकांमध्ये पारंपरिक कलेविषयीची आवड निर्माण करण्याचा उद्देश आयोजकांनी ठेवला आहे.

जय हिंद क्रीडा मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा सन्मान करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

या अनोख्या आणि भव्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी, कला रसिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. गोवळकोटमध्ये प्रथमच होणारी ही पालखी नृत्य स्पर्धा निश्चितच सांस्कृतिक पर्व ठरणार असून, उत्साह, परंपरा आणि कलात्मकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.