उद्योजक किरण सामंत यांची माहिती : मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांचा आढावा दौरा ; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण : बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना वाढवत असताना येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे युतीच्या माध्यमातून जी जबाबदारी देतील ती यशस्वीपणे पार पाडणे हे आपले पाहिले कर्तव्य असणार आहे. असा विश्वास उद्योजक किरण सामंत यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, येत्या २० ऑक्टोबरला मालवण वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला असून हा मेळावा भव्यदिव्य स्वरूपात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मालवण दौऱ्यावर आलेल्या किरण सामंत यांनी सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्योजक महेश राणे, संजय आंग्रे, बबन शिंदे, किसन मांजरेकर, राजा गावकर, विश्वास गावकर, उल्हास तांडेल, बाळू नाटेकर, भूषण परुळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मालवण वायरी येथे २० तारखेला होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, येत्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी आपल्या नावाची चर्चा आहे. मात्र युती म्हणून निवडणूक लढवताना पक्ष संघटना, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री राणे जी जबाबदारी सोपवतील ती पार पाडणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यावर आपला भर राहणार आहे. आज अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असून त्या सर्वांना सोबत घेत लवकरच कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.
आजच्या दौऱ्यात सर्वसामान्यांच्या विकासाचे, रोजगाराचे अनेक प्रश्न असल्याचे दिसून आले आहेत. या समस्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडून त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली असली तरी त्यातील जी कामे योग्य व जनहिताची आहेत त्या कामांना अडचण नसेल. याबाबत शासन योग्य निर्णय घेईल. असे त्यांनी सांगितले.