राजापुरातील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या जमिनीचा दर शासनाने जाहिर करावा –प्रमोद जठार

रोजगार निर्मितीने कोकणात आर्थिक सुमृध्दी येईल

लोकसभा निवडणूकीत रोजगाराचाच मुद्दा महत्वाचा ठरणार

राजापूर (प्रतिनिधी): बेरोजगारांना रोजगाराची कोणतीच संधी नसल्याने आज राजापूरच नव्हे तर संपुर्ण कोकणच्या विकासाला खिळ बसली आहे. यासाठी या तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची अंमलवबजावणी झाल्यास कोकण हे आर्थिक विकासाचे केंद्र बनेल त्यामुळे आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक ही बेरोजगारीच्याच मुद्दयावर लढली जाईल आणि या मतदार संघाच्या व कोकणच्या विकासासाठी महायुतीचा खासदार दिल्लीतील मोदी सरकारमध्ये असेल असा दावा भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रमुख व माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत केला.

तालुक्यात प्रस्तावित असलेल्या या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी अनेकांनी आपल्या जागा देण्याचे मान्य केलेले असतानाही शासन यासाठी जागेचे दर का जाहिर करत नाही असा खडा सवाल उपस्थित करून शासनाने तात्काळ यासाठी जागेचे दर जाहिर करावेत, ज्यांना प्रकल्पासाठी जमिनी द्यावयच्या आहेत ते देतील ज्यांना नाही द्यायच्या ते नाही देणार दुध का दुध व पाणी का पाणी होऊन जाऊद्या असे रोकठोक मतही जठार यांनी मांडले.

कोकणामध्ये बेरोजगारी वाढली असून कोकणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता आहे. प्रकल्प होण्यासाठी आवश्यक जागा देण्यासाठी शेतकरी पुढे आलेले आहेत. आता त्यासाठी शासनाने जागेचा दर तात्काळ जाहीर करावा अशी मागणी जठार यांनी केली. यासाठी शेतकरी आणि जागा मालक जागा देण्यास तयार असल्याचे सांगताना रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यामध्ये कोकण निश्चितच आर्थिक राजधानी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोकणामध्ये दिवसागणिक बेरोजगारी वाढत चालली आहे. लोकांसह तरूणांच्या हाताला काम अन् रोजगार मिळणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने युवा वर्ग रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतरीत होत असून ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होण्यासाठी रिफायनरी प्रकल्पाची उभारणी होणे गरजेचे आहे. यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री आणि उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या बारसू येथील जागेच्या केलेल्या माती परिक्षणाचा अद्यापही अहवाल जाहीर झाले नाही. याबाबत पत्रकारांनी श्री. जठार यांना विचारले असता त्यांनी माती परिक्षणाच्या अहवालापेक्षा लोकांना जमिनीचा मोबदला शासनाने जाहीर करणे महत्वाचे असल्याचे मत यावेळी मांडले. त्यामुळे आपण शासनाकडून जागेचा मोबदला जाहीर होण्यासाठी आग्रही असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उ. बा. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आजपर्यंत एका बेरोजगार युवकाला तरी रोजगार दिला का ते अगोदर जाहिर करावे आणि मग प्रकल्पाला विरोध करावा असे आव्हान जठार यांनी यावेळी दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातुन जर या प्रत्येक गावातील ५० मुलांना रोजगार मिळाला तर गाव आणि वाडया पुन्हा गजबतील व कोकणात पुन्हा एकदा आर्थिक सुबत्ता येऊन कोकण समृध्द होईल असे जठार म्हणाले.

भाजपा पक्षसंघटन अधिक बळकट करताना व केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यत पोहचवून ज्यांना लाभ मिळतो त्यांचे अभिनंदन करून ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत विकासाभिमुख व लोकाभिमुख काम पक्षाच्या माध्यमातुन केले जाणार असल्याचे जठार यांनी यावेळी सांगितले. तर पक्ष संघटना अधिक बळकट करताना बुथ कमिटया अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गुरव, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिल करंगुटकर, स्वप्नील गोठणकर, अरविंद लांजेकर, सौ. सुयोगा जठार यांसह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.