कुडाळमध्ये भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने

कुडाळ | प्रतिनिधी

महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ केला. या वादामध्ये भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि दंगल नियंत्रक पथक हैराण झाले.

कुडाळ नगरपंचायत कार्यालय येथे विकसित भारत संकल्प यात्रा आली होती या यात्रेवरून कुडाळ नगरपंचायतीच्या सभेमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीचे नगरसेवक व भाजपा नगरसेवक यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती ही खडाजंगी मोदी सरकार या नावावरून झाली होती. दरम्यान यात्रा आज (शुक्रवार) कुडाळ नगरपंचायत येथे आल्यावर याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गोळा झाले. आणि त्यांनी घोषणाबाजी केली. त्या ठिकाणी या यात्रेचे उद्घाटन करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी मोदी सरकारच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हे रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

हा कार्यक्रम सुरू होणार असतानाच सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक तथा गटनेते मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सौ. सई काळप, नगरसेविका सौ. श्रेया गवंडे, अतुल बंगे आदिंनी पुढे येत या यात्रेचे आम्ही स्वागत करतो मात्र यात्रेतील रथावर मोदी सरकार उल्लेख आहे त्याला आमचा आक्षेप असल्याचे सांगत विरोध केला. यावेळी पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी सत्ताधारी गटाला समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ताधारी गट आपल्या भुमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे काहीसा गोंधळ सुरू झाला. याच दरम्यान भाजपा गटाच्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करत कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे सत्ताधारी गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असताना उद्घाटनाचा मान विरोधकांना का दिला? असा प्रश्न यावेळी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी अरविंद नातू यांना केला. यावेळी पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनाही सत्ताधारी गटाने खडेबोल सुनावले. कार्यक्रम सुरू होताच भाजप नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी दिली. त्यानंतर या ठिकाणचे वातावरण चांगले तापुन गेले. परिस्थितीचे गांभिर्य पाहुन पोलिसांनी दंगल नियंत्रक पथकाला पाचारण केले. यावेळी दोन्ही गटांना बाजुला करण्याचे पोलिस व दंगल नियंत्रक पथकाने प्रयत्न केले मात्र दोन्ही बाजुकडील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या भुमिकेवर ठाम राहिले, त्यामुळे पोलिस व दंगल नियंत्रक पथक हतबल झाल्याचे दिसुन आले.

यावेळी भाजप नगरसेवक निलेश परब, चांदणी कांबळी, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, अ‍ॅड राजु कुडाळकर, आनंद शिरवलकर, राजु राऊळ, दादा साईल, मोहन सावंत आदींनी जोरदार विरोध करत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे श्री. नातू माघारी परतले. त्यानंतर पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला आवाज कमी करण्यासाठी पुढे आले. त्याच दरम्यान गाडीत असलेले पोलिस रूपेश सारंग यांच्यावर भाजप गटाने प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला व भाजपा नगरसेवक पदाधिकार्‍यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. हा वाद कमी होतो न होतो तोच सत्ताधारी महाविकास आघाडी गटाकडुन मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी पुन्हा पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला सत्ताधारी गटाकडे धावून आले. सत्ताधारी व विरोधक या दोन्ही गटांना थोपविण्यात पोलिस व दंगल नियंत्रक पथकाची दमछाक झाली. याच दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे दाखल झाल्या त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या गटाला शांत राहण्याची विनंती केली. मात्र सत्ताधारी गट आपल्या भुमिकेवर ठाम राहिला. अखेर भाजपा नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अरविंद नातू यांना आपल्या गटाकडे बोलावून घेत कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थित नागरीकांना सांगण्याची विनंती केली. त्यानुसार श्री. नातू यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत विविध योजनांचा लाभ घ्या असे आवाहन केले.

यावेळी सत्ताधारी गटाने कुडाळ नगरपंचायतच्या प्रथम नागरीक यांना डावलून पोलिसांनी हा कार्यक्रम कसा काय सुरू केला? असा सवाल उपस्थित करत पुन्हा एकदा मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी पोलिसांनी भाजप नगरसेवक पदाधिकार्‍यांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न फेल ठरला. याच दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित झाले. यावेळी नियोजित वेळेच्या आधी कार्यक्रम कसा काय संपविला? असा प्रश्न मुख्याधिकार्‍यांना विचारला. यावेळी श्री. प्रभाकर परब यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत प्रशासक म्हणुन तुम्ही कुचकामी आहात असा मुख्याधिकार्‍यांवर आरोप केला. या गोंधळानंतर मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी सायंकाळी उशिरा पोलिस स्थानकात धाव घेतली. दरम्यान या गोंधळामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत विकसीत भारत यात्रेचा रथ त्या ठिकाणाहून हलविण्यात आला नाही.
गोंधळात लाभार्थ्याचे हाल
विकसीत भारत यात्रे दरम्यान विविध योजनांचे स्टॉल कुडाळ न.पं. प्रांगणात लावण्यात आले होते. मात्र दोन्ही गटाकडुन जोरदार घोषणा आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे संपुर्ण कार्यक्रम गोंधळातच पार पडला. यावेळी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला. लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

अडवणुक करणार्‍यांची पोलिसात फिर्याद – अरविंद नातू

शासनाने जो कार्यक्रम राबवून दिला होता तो नियोजित वेळेत पार पाडणे आवश्यक होतं त्यानुसार आम्ही तो कार्यक्रम केलेला आहे. या दरम्यान अडवणुक करण्याचा प्रयत्न झाला त्या विरोधात पोलिस स्थानकात योग्य ती फिर्याद आम्ही देत आहोत. घडलेल्या घटणेची फिर्याद पोलिस स्थानकात आम्ही देत असल्याची माहिती कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी दिली.

 

प्रशासन कुचकामी – प्रभाकर सावंत

मोदी रथाला ठिकठिकाणी अडविण्याचे काम होत आहे हे चुकीच आहे. जनसामान्यांना या उपक्रमात मत मांडण्याची संधी आहे. सरकार म्हणुन एखादा चांगला विषय आला तर त्याचा आम्ही निश्चितच विचार करू. आज झालेला विरोध हा अज्ञान बुध्दीने झालेला विरोध आहे. आजचा विरोध हा विरोधाला विरोध म्हणुन केला आहे. या विरोधाचा आम्ही भाजप म्हणुन निषेध करत आहोत. याठिकाणी प्रशासनाने योग्य पध्दतीने हा विषय हाताळला नाही. प्रशासनाला कल्पना असतानाही याठिकाणी योग्य ती काळजी घेतली नाही. दबावाला बळी पडुन प्रशासनाने या कार्यक्रमाचा विचका केला. आमच्या सदस्यांना वाईट वागणुक दिली. याबाबतची कल्पना पालकमंत्री रविंद्र चव्हाण व केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना दिली. आता मुख्याधिकारी यांनी अडथळा आणणार्‍यां विरोधात फिर्याद देवून अशी ग्वाही दिली आहे. त्यांनी आपली भुमिका चोख न बजावल्यास त्यांच्या विरोधात हक्कभंग आणु. असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिला आहे.