तुटलेल्यांचा वीजेच्या तारांचा स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

कणकवली : सांगवे – तेलंगवाडी येथील शेतकरी विनोद रामचंद्र मोर्ये ( वय ५५ ) यांचे तुटून पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झाला. विनोद मोर्ये हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास गुरे शोधण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्यामुळे पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते‌ कुठेही आढळून आले नाहीत. ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविली असता विनोद‌ हे सांगवे – तेलंगवाडी येथील दत्त्याचा उचवळा येथे तुटून पडलेल्या विद्युत वायरनजीक मयत स्थितीत पडलेले आढळले.‌ घटनेची माहिती समजताच महावितरणचे अधिकारी व पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळ गाठले होते. विनोद तयांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी व मुलगा, तीन विवाहित भाऊ असा परिवार आहे.