दोडामार्ग मधून राजेंद्र निंबाळकर यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड

दोडामार्ग : प्रवीण परब

    सिधुदुर्ग जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाचे उपसचिव  नि. भा. खेडकर यांच्या लेखी पत्रान्वये जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

     दोडामार्गचे राजेंद्र निंबाळकर हे पदवीधर असून गोवा येथे त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अगदी तरुण वयातच त्यांनी समाजकारणासह राजकारणात प्रवेश करताना कोनाळ ग्रामपंचायतचे सरपंच पद भूषविले. तिलारी धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती गठीत केली. त्या समितीच्या अध्यक्षपदी काम करताना त्यांनी धरणग्रस्तांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला. काँग्रेसचे युवक अध्यक्ष, त्यानंतर दोडामार्ग पंचायत समिती सदस्य, उपसभापती, दोडामार्ग काँग्रेस तालुकाध्यक्ष अशी अनेक पदे भूषविली.

    गेली अनेक वर्षे शासकीय यंत्रणेतील कामकाजाचा दांडगा अनुभव असून ग्रामपंचायत ते पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये धडाडीने काम केले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या अनुभवाचा जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी निश्चितच फायदा होणार आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.