आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांची माहिती
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत केली पाहणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच पद भरती प्रक्रिया होणार आहे. या महिना अखेरपर्यंत आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यासाठी १६ स्टाफ नर्सना हजर होण्याचे आदेश आपण काढले असून त्या लवकरच हजर होतील, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी दिली.
कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी शुक्रवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्तपदांबद्दल विचारलं असता या महिना अखेरपर्यंत जास्तीत जास्त रिक्त पदे भरली जातील अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. मुरली चव्हाण यांसह उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
शुक्रवारी सकाळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी आयसीयु, कॅझ्युअल्टी, प्रसुती विभागासह रूग्णालय परिसराची पहाणी केली. रूग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची देखील त्यांनी विचारपूस करत सेवेबद्दलची माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले, संपूर्ण रूग्णालयाची आपण आज पहाणी केली. रुग्णांचे व नातेवाईकांचे चांगल सहकार्य आम्हाला मिळतं आहे. येथील अधिकारी, कर्मचारी देखील चांगली सेवा देत आहेत. काही अडचणी आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. लवकरच त्याही दुर होतील. नर्सचा अभाव लक्षात घेता १६ स्टाफ नर्सना जिल्ह्यात हजर होण्याचे आदेश आपण काढले आहेत. तर वैद्यकीय अधिकारी व इतर जिल्हास्तरावरील भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्य स्तरावरील स्पेशालिस्ट डॉक्टरची भरती देखील आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच होईल. चांगल्या सुविधा आपणास येथून मिळणार आहेत. क्लिरिकल व इतर रिक्तपदेही भरली जाणार आहेत. या महिना अखेरपर्यंत सर्व रिक्तपद भरण्याचा आपला प्रयत्न आहे असं मत डॉ. माने यांनी व्यक्त केल.











