महानंदा प्रकल्प गुजरातला जाणार नाही- सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील
चिपळूण (संतोष सावर्डेकर) :
कोकणी माणूस जिद्दी आहे, कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, त्याला खंबीरपणे साथ देण्याची व सहकार्याची गरज आहे. प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणी माणसाला येथील तरुणाला आणि विशेष म्हणजे येथील शेतकऱ्याला एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे वाशिष्ठी दूध प्रकल्पामुळे येथील शेतकरी समृद्ध होईल, असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. वाशिष्ठी प्रकल्पाने आयोजित केलेल्या कृषी व पशुधन महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. महानंदा प्रकल्प गुजरात ला जाणार नाही, तो महाराष्ट्रातच राहील असेही ठामपणे ते म्हणाले.
कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सव
चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन प्रशांत यादव व सौ.स्वप्ना यादव यांनी चिपळूण बहादूरशेख येथील सावरकर मैदानावर कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी त्याचे उदघाटन ना.दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार विनय नातू, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, जि.प.चे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, चिपळूण नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डी. एस. जगदाळे तसेच कृषी जिल्हा अधीक्षक डॉ. सुनंदा कुराडे, सहाय्यक निबंधक दुग्ध संस्था श्री. यशवंतराव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, माजी सभापती पूजा निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, पूर्वा वळसेपाटील, उबाठा गटाचे चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी सभापती पूजा निकम, ऍड. नयना पवार, यांच्यासह अनेक मान्यवर व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
आज सर्वाधिक आनंद
ना.वळसे पाटील यावेळी म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर आज कोकणात आलो आणि आज मला सर्वाधिक आनंद देखील मिळाला. कोकणात इतका मोठा प्रकल्प तो ही अत्याधुनिक पद्धतीने प्रशांत यादव यांनी उभारला आणि तो यशस्वी देखील होत आहे याचा खूप आनंद मला होत आहे. कोकणात सहकार रुजत नाही, प्रकल्प टिकत नाही असा जो समज तयार करण्यात आला होता त्याला प्रशांत यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून चोख उत्तर दिले आहे.असेही ना.वळसे पाटील म्हणाले.
स्वप्न मोठी पहावी
स्वप्न पाहताना ती मोठी पहावी आणि त्याचा पाठलाग प्रामाणिकपणे हिमतीने करावा म्हणजे यश हमखास मिळते. छोटी-छोटी स्वप्ने पाहू नका. पशुधन खरेदी करताना देखील पाच सहा लिटर दुध मिळेल इतके मर्यादित न राहता किमान ५० लिटर ची अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी पुढे जाण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. तरच या स्पर्धेत तुम्ही टिकू शकाल,आणि वाशिष्ठी प्रकल्प देखील यशस्वी वाटचाल करेल.शेतीला पूरक व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे बघा, असे मोलाचे मार्गदर्शनही ना.दिलीप वळसे पाटील यांनी केले.
बँकांनी पुढे आले पाहिजे
कोकणी माणूस फार जिद्दी आहे. तो कष्टाळू आहे.प्रामाणिक आहे. कितीही आपत्ती आली तर तो घाबरत नाही. खचत नाही. पुन्हा उभा राहतो, येथील शेतकरी कधीही आत्महत्या करत नाही. त्याला खंबीर साथ देण्याची गरज आहे. त्यासाठी येथील बँका विशेषतः जिल्हा बँक आणि पतसंस्थानी पुढे आले पाहिजे, येथील तरुणांसाठी नवनवीन योजना आणल्या पाहिजेत, येथे महिला बचत गट भरपूर आहेत त्यांच्यासाठी विशेष योजना आणून त्यांना आर्थिक सहकार्य केले पाहिजे.प्र शांत यादव यांनी एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. येथील बँका आणि पतसंस्थानी जर शेतकऱ्यांना साथ दिली तर कोकणातील शेतकरी समृद्ध होईल आणि मुंबईकडे नोकरीसाठी जाणारा वर्ग पुन्हा कोकणात परतेल. असा विश्वासही ना.वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सावकारी बाबत लवकरच निर्णय
बँका कर्ज देत नाही म्हणून शेतकरी ,तरुण सावकाराकडे जातात कर्ज घेतात आणि नंतर सावकार त्यांची पिळवणूक करतो अखेर आत्महत्या हा पर्याय निवडतात.सुदैवाने कोकणात आत्महत्या होत नाहीत. परंतु येथे देखील सावकाराची पिळवणूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत २ बैठका झालेल्या आहेत. तिसऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होऊन सावकारीला चाप लावण्यासाठी मजबूत धोरण आणले जाईल असेही ते म्हणाले.
ते अजित दादा करतील
चिपळूण येथील शासकीय डेअरीची जागा वाशिष्ठी प्रकल्पाला द्या अशी मागणी शेखर निकम यांनी केली, त्या संदर्भात ना.वळसे पाटील म्हणाले, शेखर सर माझ्यापेक्षा जास्त अजित दादा तुमचे ऐकतात, तुम्हाला ते कधीच नाही म्हणत नाहीत. त्यामुळे मी तुमच्या सोबत येतो, आपण अजित दादाकडे जाऊया, तुम्ही त्यांना त्या जागेबाबत सांगा अजित दादा नक्की ते काम करतील.आणि तुमची मागणी पूर्ण होईल. येथे चारा उत्पादन प्रकल्प तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण असे काही करता येते का ते मी सरकारच्या वतीने प्रयत्न करतो, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
येथील शेतकऱ्यांना अनुदान द्या- आ. शेखर निकम
आमदार शेखर निकम यांनी आपल्या भाषणात दोन प्रमुख मागण्या केल्या. दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तो निर्णय येथे ही लागू करा, कोकणातील शेतकऱ्यांना देखील ५ रुपये अनुदान द्या. तसेच येथील शासकीय डेअरीची जागा वाशिष्ठी प्रकल्पाला द्या. असे थेट मागण्या करत त्यांनी मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. जागेबाबत ना.वळसे पाटीलांनी सकारात्मकता दाखवली पण अनुदानबाबत मात्र त्यांनी मौन पाळले.
म्हणून कोकण मागे- भावे
दुग्ध आणि भाजीपाला लागवड हे शेतीला जोड व पूरक व्यवसाय आहेत. परंतु कोकणी माणसाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि फक्त शेतीवरच लक्ष केंद्रित केले, त्यामुळे कोकण मागे राहिले. आता गरज आहे. शेती पूरक व्यवसायाकडे वळा, हे पारंपरिक व्यवसाय पुन्हा सुरू करा. कोकणात समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. असे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी केले.
यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा विशेष सन्मान तसेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांना ना. दिलीप वळसेपाटील यांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- प्रशांत यादव
प्रस्ताविकात वाशिष्ठी डेअरीचे प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेतांना शेती व शेती पूरक उद्योग करण्याचे स्वप्न चव्हाण साहेबांनी पाहिले. पूर्वी निकम यांनी पाहिले पण ते प्रयत्न अपुरे पडले. शेतकरी कष्टाळू आहे. त्याला योग्य मार्गदर्शन व सुविधा दिल्या. योग्य बाजारपेठ उपलब्ध केली तर पश्चिम महाराष्ट्रसारखा होईल. येथील दूध घाटावर नेत होते. तंत्रज्ञान नसले तरी शेतकरी चांगले काम करतोय. दुधावर लक्ष केंद्रित केले. ३९ केंद्र आहेत. दर २० कि.मी. वर १० बीएमसी तयार केलेल्या आहेत. आज ३२ हजार ५०० लिटर दूध आहे. ४ हजार शेतकरी या प्रकल्पाला दूध घालतात. स्पर्धेला तोंड देण्यासाठी शेतकरी सक्षम व्हावा म्हणून हे मोठे प्रदर्शन आहे. विश्वास व पाठबळ देताय ते महत्वाचे आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. या मिशनसाठी सर्वांनी साथ द्यावी, असे प्रस्ताविकाद्वारे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदाळे यांनी मनोगत मांडले. महोत्सवाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. तर या उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाशिष्टी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.












