कोकणातील क्रांतीकारकांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकार करत आहेत- अ‍ॅड. सौ. हुस्नबानू खलिफे

राजापूर पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा

राजापूर | वार्ताहर : कोकण ही क्रांतीकारकांची भूमी आहे. आजवर झालेल्या सर्वच क्रांतीलढयात कोकण नेहमीच अग्रस्थानी राहिलेला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई पासून, अटकेपार झेंडा रोवणारे नरवीर बापू गोखले, असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांपर्यत अनेकांनी ही परंपरा चालवत समाजाला दिशा देण्याचे काम केले. हाच वारसा आता राजापूरातील पत्रकार मंडळी नेटाने पुढे नेत असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार अ‍ॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी येथे काढले.

राजापूर पत्रकार संघाच्या वतीने शनिवार ६ जानेवारी रोजी ’पत्रकार दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त राजापूर पत्रकार संघाचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला. राजापूर नगर वाचनालय सभागृहात राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीतील प्रसिध्द उद्योजक किरण सामंत उपस्थीत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने, नगर वाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावलकर, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, राजापूर तालुका वकिल संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, राजापूर तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष अशफाक हाजू, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राजापूर पत्रकार संघाचे वतीने उन्हाळे येथील डॉ. अजित जोशी यांना सेवाभावी डॉक्टर, ससाळे शाळेच्या शिक्षिका सौ.रोशनी मोहिते यांना आदर्श शिक्षक, सौंदळ येथील शेतकरी वासुदेव घाग यांना आदर्श शेतकरी तर बज्मे उर्दु अदब राजापूर या संस्थेला उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते आदर्श संस्था पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित उपक्रमातून नासा आणि इस्त्रो भेटीसाठी निवड झालेल्या शमिका शेवडे, शर्वरी काळे, जस्लीन हाजू, शालिनी तेरवणकर, राज सावंत, मंथन तांबे, यांचा तसेच तायक्वोंदा स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविलेल्या प्रांजली चव्हाण, जलतरण मध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या स्नेहा रहाटे या विद्याथ्र्यार्चा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य महेश शिवलकर यांची राजापूर नगर परिषदेच्या स्वच्छता अभियान ब्रन्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्याबद्दल व पत्रकार प्रकाश नाचणेकर यांनी सर्पमीत्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार संघाचे वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना अ‍ॅड. सौ. खलिफे यांनी राजापूर पत्रकार संघाच्या कामाचे कौतुक करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रांताधिकारी श्रीमती माने यांनी राजापूरातील पत्रकारांचे विशेष कौतुक केले. सकारात्मक पत्रकारिता करताना विविध समाजोपयोगी उपकम ते राबवत असतात. समाजात आदर्शवत कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पत्रकार करत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. तर यावेळी शेखरकुमार अहिरे, रविंद नागरेकर, प्रशांत भोसले, प्रकाश मांडवकर, पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यांसह उपस्थीत मान्यवरांनी पत्रकार दिनानिमत्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.तर लोकमान्य को ऑप. सोसायटीच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांनी पत्रकार संघाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा मांडला. कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्वलन व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यकमाचे सुत्रसंचालन विनोद पवार यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळयाचे सुत्रसंचालन राजेंद्र बाईत, प्रकाश नाचणेकर, संतोष मोंडे यानी केले. आभार शरद पळसुळेदेसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कतीक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य राजेंद्र जोगळे, संतोष शिंदे, प्रकाश वळंजू, गोकुळ कांबळे, संदीप गादीकर, मनोहर धुरी, समीर सुतार, विठोबा चव्हाण, तुषार भारती, विठोबा चव्हाण, राहुल वर्दे, उमेश दळवी आदी उपस्थीत होते.