किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त महिलाश्रम मधील मुली, महिलांना केले ब्लॅंकेट आणि अन्नधान्याचे वाटप
लांजा | प्रतिनिधी : हम सबके सब हमारे हे ब्रीदवाक्य घेऊन गेली अनेक वर्षे लांजा तालुक्यासह जिल्ह्यात सामाजिक काम करणाऱ्या मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाच्या वतीने रत्न सिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलाश्रम लांजा या सेवाभावी संस्थेतील महिला आणि मुलींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अन्नधान्य व अन्य वस्तूंचे देखील यावेळी वाटप करून संस्थेने आपल्या दातृत्वाचे उदाहरण घालून दिले.
लांजा तालुक्यासह जिल्हाभरात मुस्लिम वेल्फेअर सोसायटी चे काम सुरू आहे. नाव मुस्लिम वेल्फेअर सोसायटी असली तरी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या, गोरगरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने ही संस्था कार्यरत आहे. याच अनुषंगाने रत्न सिंधू योजनेचे सदस्य असलेले किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेचे कार्याध्यक्ष व संस्थापक अकिल नाईक यांनी संस्थेच्या वतीने महिलाश्रम लांजा या सेवाभावी संस्थेतील सर्व मुली तसेच महिला यांना ब्लॅंकेटचे वाटप केले. तसेच अन्नधान्य, डाळी यांचे देखील वाटप करून संस्थेने आपण दातृत्व जपत असल्याची चुणूक दाखवून दिली
याप्रसंगी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अकील नाईक ,अध्यक्ष रफिक नाईक, सचिव राजू नाईक, युवा अध्यक्ष आकिब मुजावर, सल्लागार मंदार देसाई आणि धीरज मराठे उपस्थित होते. त्या सर्व वस्तू महिलाश्रम लांजाच्या शिक्षिका अनुजा कांबळे तसेच महिला निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका ज्योती यादव, बालगृह अधीक्षिका सायली वाघदरे आणि ज्येष्ठ क्लार्क शांताराम शिवगण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने केलेल्या या भरीव मदतीबद्दल महिलाश्रम संस्थेच्या वतीने शिक्षिका अनुजा कांबळे यांनी अकिल नाईक व संस्थेचे आभार मानले.










