मंडणगड | प्रतिनिधी- यू.जी.सी., महाराष्ट्र शासन पुरस्कृत व मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध कलागुण दर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘युवा जल्लोष’ नुकताच मंडणगड येथील डॉ. आंबेडकर सभागृहात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडणगडचे पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मा. विशाल जाधव गट विकास अधिकारी, सोनल बेर्डे नगराध्यक्ष, वैभव कोकाटे उपनगराध्यक्ष, पत्रकार सचिन माळी, पत्रकार विनोद पवार, सुषमा दिवेकर सरपंच पाट, विजय दुर्गवले, शिवाजी कोवळे, विजय जाधव तसेच महाविद्यालयाचे समन्वयक व कार्यक्रमाध्यक्ष डॉ. दिपक रावेरकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी ‘युवा जल्लोष’ या कार्यक्रमात विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. यामध्ये गीत, गायन, संगीत नृत्य तसेच अंधश्रद्धा, नशामुक्ती, स्वछता यावर आधारीत नाटकांनी भरगच्च कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांना विद्यार्थ्यानी शेवटपर्यंत अक्षरश: खिळवून ठेवले. श्रोत्यांनी देखील दिलखुलाश दाद देऊन प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात महाविद्यालयाचे सहा. प्रा. अरुण ढंग यांनी महाविद्यालय स्थापनेपासून ते आतापर्यंत महाविद्यालयातील सुविधाबाबत माहिती देत भविष्यात व्यावसायिक शिक्षण देणार्या या एकमेव महाविद्यालयात पाल्यांना प्रवेश घेण्याचे त्यांनी मंडणगडवासीयांना आवाहन केले. यावेळी मंडणगड तालुक्यातील शैक्षणिक, शासकीय, सामाजिक, व्यापार, उद्योग व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंडणगड परिसरातील विद्यार्थ्यानी, पालकांनी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख सहा. प्रा. सायली घाडगे तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. अरुण ढंग यांनी केले.












