नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मिशन ४८ हेच ध्येय : पालकमंत्री उदय सामंत

14 जानेवारीला होणार महायुतीचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची झाली पहिली बैठक

रत्नागिरी : महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकदिलाने काम केल्यास सर्व निवडणुकांमध्ये आपली बाजी असेल. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मिशन ४८ हे ध्येय्य उराशी बळगले पाहिजे. आता महायुती म्हणून एका गाडीतून फिरले पाहिजे. आजपासून माझा रत्नागिरीत किंवा जिल्ह्यात जो कार्यक्रम असले त्याला महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण असेल, असे प्रतिपादन मुख्य समन्वयक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. लवकरच महायुतीचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संक्रातीदिवशी (ता.१४) रत्नागिरीत होणार आहे. याला प्रमुख ३ हजार समन्वयक उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची महत्त्वाची आणि पहिली बैठक आज विवेक हॉटेलमध्ये झाली. यावेळी भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोद जठार, शिवसेनेचे सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यासह तिन्ही पक्षाच्या महिला संघटक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तिन्ही पक्षाच्या समन्वयकांनी एकजुट ठेऊन ग्रामपंचायत ते खासदारकीच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. लवकरच महायुतीचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संक्रातीदिवशी (ता.१४) रत्नागिरीत होणार आहे. याला प्रमुख ३ हजार समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
उदय सामंत म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मिशन 48 घेऊन पुढे जायचे आहे. यामध्ये लोकसभेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन्ही मतदारसंघाचा समावेश असणार आहेत. या बैठकीमुळे महायुतीची ताकद बळकट झाली आहे. ग्रामपातळीपर्यंत चांगला समन्वय ठेवायचा आहे. राज्यात समित्या तयार झाल्या. महाराष्ट्र जसे वातावरण आहे तसे सकारात्मक वातावरण आपण स्थानिक पातळीवर ठेवले पाहिजे. तिळगुळ नसतानाही गोड बोलू. विचार वेगळे असेल तरी मिशन एकच आहे. आजची वेळ चांगली परंतु मिशन ४८ नव्हे तर मिशन 215 सुद्धा आपल्या समोर आहे. आपल्यातले मैत्रिपुर्ण संबंध अधिकदृढ झाले पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या 56 गटात आपण जाऊन पक्षीय काम करू. एकमेकाला हात देऊ. उमेदवार देण्याचा अधिकारी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांना आहे. कोणी आपल्या महायुतीबद्धल बोलल्यास आपली भुमिका मांडण्यासाठी समिती हवी. एकत्र नसल्याने काहीलोक फायदा घेत आहेत. त्यात नुकसात तिन्ही पक्षांचे होणार आहे. परंतु आपण एक झालो तर अनेक जण पक्षात येतील. राजापूर महयुतीचा बालेकिल्ला आहे, हे परवाच्या आमच्या मेळाव्यानंतर स्पष्ट झाले. एकत्र बसताना खुल्या मनाने बसा. भविष्यातील दोन्ही खासदार आणि जिल्ह्यातील पाच आमदार महायुतीचेच असतील असेही ते म्हणले.