चिपळूण न.प.चे खत झाले ब्रँडेड

शासन स्तरावरून हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड प्राप्त

चिपळूण (प्रतिनिधी) : नगर परिषदेच्या शहरातील शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे खत आता ब्रँडेड झाले आहे. या खताला शासन स्तरावरून हरित महासिटी कंपोस्ट ब्रेड प्राप्त झाले आहे. दर चार दिवसांनी २ टन खत तयार होत असून आतापर्यंत १० टन खत येथे उपलब्ध आहे. त्याची विक्री सुरू करण्यात आली आहे.

नगर परिषदेचे सफाई कामगार शहरातून दरदिवशी १५ टन कचरा उचलतात. हा कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून शिवाजीनगर प्रकल्पात नेला जातो. त्यात सुमारे ७ टन ओला कचरा असतो. या कचऱ्यावर घन कचरा प्रक्रिया केंद्रावर असलेल्या ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्ट मशीन व बायोगॅसद्वारे प्रक्रिया होते. त्यातून दर चार दिवसांनी २ टन खत तयार होते. या खताचा शेतकऱ्यांना, नागरिकांना फायदा व्हावा, त्याची विक्री करता यावी म्हणून हे खत तपासणीसाठी कोल्हापूर खत नियंत्रण प्रयोगशाळेकडे पाठवले होते. या प्रयोगशाळेने दिलेला अहवाल अहवाल राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी मुंबई यांचेकडे हरीत ब्रैडसाठी पाठवला होता. त्याची राज्य अभियान संचालकांनी छाननी केली. त्यात हरीत बँडसाठी लागणारी सर्व गुणांकने एफसीओ मानकानुसार बसत असल्याने खतास हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड प्राप्त झाला आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पात खत निर्मिती करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.

चौकट-

खताची होणार विक्री

नगर परिषद तयार करीत असलेले खत उत्तम प्रतीचे असल्याने हरित ब्रँड प्राप्त झाला आहे. त्यामुळे आम्ही आता हरित ग्रँडच्या नावाने खत विक्री करू शकतो. हे खत विक्रीसाठी उपलब्ध असून नागरिकांनी ते खरेदी करावे. त्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

-प्रसाद शिंगटे मुख्याधिकारी न.प., चिपळूण.