प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्यासह प्रशासनाचे सर्वत्र होतेय कौतुक

पूर परिस्थिती वेळी यंत्रणा ठेवली सज्ज

चिपळूण | प्रतिनिधी : आपत्तीमध्ये प्रशासकीय यंत्रणा वराती मागून घोडे नाचवते, असा अनुभव जनतेला येतो. मात्र, सध्या चिपळूणकरांना येथील प्रशासनाचा आश्चर्यकारक अनुभव येऊ लागला आहे. नव्याने दाखल झालेले प्रांताधिकारी अशोक लिंगाडे यांनी स्वतःसह प्रशासनाच्या साऱ्या यंत्रणा फिल्डवर उतरवून कार्यवाही सुरू केली असल्याने चिपळूणकरांना सुखद धक्का मिळालाच बरोबर प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीने जनता मात्र मनोमन सुखावली असल्याचे पहावयास मिळत असून प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

जोरदार पाऊस अतिवृष्टीचा इशारा आणि शहरात महापुराचे भरत असलेले पाण्याने चिपळूणकरांच्या काळजाचा ठोका चूकला. दोन वर्षांपूर्वीच्या महापुराच्या आठवणी धास्तावलेल्या चिपळूणच्या जनतेला यावेळी मात्र प्रशासनाचा खंबीर आधार मिळाला. नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीने विश्वास बसू लागला आहे.नव्याने दाखल झालेले प्रांताधिकारी अशोक लिंगाडे यांनी महापुराच्या वा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेला स्वतासह फिल्डवर उतरवल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारी रात्रीपासून प्रशासन अलर्ट झाले महत्वाच्या ठिकाणी पोलीस, तलाठी,ग्रामसेवक, नगरपालिका कर्मचारी एनडीआरएफ आशा साऱ्या यंत्रणा चिपळूण शहरात उतरवल्या. धो- धो पावसात दिवस रात्र सारी यंत्रणा महापुराच्या पार्श्वभूमीवर लक्ष ठेवून राहिली. याची सारी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षात एकत्र केली गेली आणि तात्काळ जनतेपर्यंत पोहचवली गेली. स्वतः प्रांताधिकारी श्री. लिंगाडे हे रात्रीपासून शहरात फिरले. बुधवारी सकाळ पासून पावसाचा जोर वाढला प्रशासनाला सातत्याने जागरूक ठेवण्याचे काम प्रांताधिकारी यांच्या सुचनेने संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी केले. शहरातील जनतेला सारी माहिती वेळेवर मिळत आहे.

एका बाजूला शहरात प्रशासन चोवीस तास अलर्ट मोडवर ठेवताना कुंभार्ली घाट आणि परशुराम घाट या ठिकाणी ही अवशक्य यंत्रणा तैनात करून ठेवण्यात आली आहे आणि त्याचा तात्काळ उपयोगही दरडी हटवण्यासाठी होऊ लागला आहे.

एकंदरीत प्रशासन वेगाने काम करीत असल्याने जनतेला आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोन वर्षांपूर्वीचे सुस्तावलेले प्रशासन आणि आजचे कार्यतत्पर प्रशासन याची आता तुलना होत असताना नव्याने सूत्र हाती घेतलेल्या प्रांताधिकारी श्री. लिंगाडे यांनी प्रशासनाबाबत जनतेत विश्वास निर्माण केला बरोबर चिपळूणकरांची मने ही जिकली आहेत. आज प्रशासनाच्या कारभाराचे कौतुक होत आहे. सोबतीला पोलिस, चिपळूण नगर परिषद, महावितरण सर्वच प्रशासन उत्तम कामगिरी बजावत आहे.