भाजपा नेते बाळासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती
लांजा : भाजपा लोकप्रिय नेते, आमदार, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब माने यांनी स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनी युवकांशी संवाद साधला. भारत सरकारच्या युवा कार्य तथा खेळ मंत्रालयाच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांच्या विद्यमाने व ग्रामजीवन आधार समाजसेवी संस्था (रत्नागिरी) यांच्या सहकार्याने राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सापुचे तळे (ता. लांजा) येथील कै. रा. सि. बेर्डे कनिष्ठ महाविद्यालयात १२ जानेवारीला झाला.
या कार्यक्रमात बाळासाहेब माने यांनी “स्वामी विवेकानंदांच्या भारताची संकल्पना जगभर मान्य आहे. आज पंतप्रधान पदावर विराजमान झालेले नरेंद्र मोदी आपल्या पुरुषार्थाने या संकल्पनेला सिद्धीस नेत आहेत. आज युवकांनी आपली कर्तबगारी दाखवण्यासाठी सज्ज व्हावे, असा संदेश विविध दाखल्यांसहित दिला. रोजगार, पायाभूत सुविधा याव्यतिरिक्त पर्यटन अशा विविध विषयांवर आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करून आगामी काळात रत्नागिरीच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आशावादी भाष्य केले.
या वेळी प्रमुख वक्ते युवा संविधान संवादक अमर पवार, ग्रामजीवन आधार समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक कांबळे, युवा नेते मिहीर माने, भाजपा रत्नागिरी तालुकाध्यक्ष संयोग (दादा) दळी, सरपंच अनंत घवाळी, उपसरपंच निलेश पाष्टे, विश्वनाथ गुरव, रुपेश पत्याने, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक संजय लोटणकर, लांज्याचे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय म्हेत्रे, अनिल गुरव, ग्रामसेवक विक्रांत साळवी आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.












