अयोध्या : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी होणार्या या सोहळ्यात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन तासांपेक्षा जास्त काळ चालणार आहे. या काळात गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केवळ पाच विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. इतर लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
प्राणप्रतिष्ठा दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि ती दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री रामजन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित राहणार आहेत.
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमासाठी सात हजारांहून अधिक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रण पत्र देण्यापूर्वी ही माहिती टपाल खात्यामार्फत साधूसंतांनाही पाठवण्यात आली. यामध्ये कार्यक्रमादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता दुपारी 1 वाजेपर्यंत होणे अपेक्षित आहे. कार्यक्रमानंतर पंतप्रधान आणि अन्य मान्यवर आपले विचार व्यक्त करतील असा कायक्रम आहे.












