19 गुंठे जमीन गायब!!

चौकशी करण्याची शेतकऱ्याची मागणी

दोडामार्ग | प्रतिनीधी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री जमिनीची होत असताना लाखों रुपयाचे व्यवहार महसूल अधिकारी यांना हाताशी धरून होत असतात त्यामुळे जमीन गैरव्यवहार वाढू लागले आहे अशा प्रकारे पिकुळे येथील तीन शेतकऱ्यांची सर्वे नंबर १८८ मधील १९ गुंठे जमीन तेथील तलाठ्याने गिळंकृत केली आहे. या तलाठ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार शेतकरी प्रदीप काशीराम नाईक यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

प्रदीप नाईक यांनी दिलेल्यातक्रारीत पुढे म्हटले आहे, पिकुळे येथील त्यांच्या सहीत तीन शेतकऱ्यांची तेथील सर्वे नंबर १८८ मध्ये ३३ गुंठे जमीन होती. त्यापैकी १४ गुंठे जमीन या शेतकऱ्यांनी विक्री केली. उर्वरित १९ गुंठे जमीन त्या सातबारावर शिल्लक असल्याची खात्री करण्यासाठी जेव्हा ऑनलाईन सातबारा पाहिला तेव्हा शुन्य गुंठे जमीन असल्याचे दिसले. म्हणून तेथील तलाठ्याकडून सातबारा घेतला असता त्यावरही शून्य गुंठेच क्षेत्र नोंद असल्याचे आढळले. याबाबत संबंधित तलाठ्याला विचारणा केली असता त्यांनी निरर्थक व उडवा उडवीची उत्तरे दिली.

तलाठ्याच्या अशा वागण्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला असून केवळ आर्थिक स्वहितासाठीच जमीन गिळंकृत केल्याचा आरोप व दाट संशय पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सूची क्रमांक २ मध्ये देखील विक्रीस गेलेले क्षेत्र एकदा नव्हे तर दोनदा ठळक अक्षरात दर्शविलेले आहे. त्यामुळे ३३ गुंठ्यापैकी १४ गुंठे जमीन विक्री केल्यानंतर १९ गुंठे जमीन सातबारा वर दिसणे आवश्यक होते. मात्र तलाठ्यांनी शून्य क्षेत्र दाखवत जमीन लाटल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच या नोंदीस मंजुरी देणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांना देखील हा प्रकार समजला नसावा का? असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवाय शेतकऱ्यांची जमीन लाटणाऱ्या व त्याची विचारणा केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या तलाठ्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि‌ शिल्लक १९ गुंठे जमीन शेतकऱ्यांस पुन्हा मिळवून देत न्याय द्यावा, अशी मागणी पीडित शेतकरी प्रदीप नाईक यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.