खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील सवेणी येथे आ. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील तीन ठिकाणी ग्रामस्थांच्या हस्ते पूजा करून व श्रीफळ वाढवून या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी माझ्या कार्यशैलीचे कौतुक करत शांत, संयमी व सुशिक्षित असा आमदार आपल्या मतदारसंघाला लाभला हे आपले भाग्यच आहे. यापुढच्या प्रत्येक निवडणुकीत आमदार म्हणून योगेश कदम यांनाच आपण निवडून आणायचे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान सर्व गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल आ. कदम यांनी आभार व्यक्त केले आणि पहिल्यांदाच महायुतीचा कार्यक्रम साजरा करत असल्याची भावना यावेळी जागृत झाल्याचे मत मांडले. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यापुढेही सर्वच कार्यक्रम आपण महायुती म्हणून साजरे करूयात असे आवाहन करून यापुढील प्रत्येक निवडणुकीत आपण महायुती म्हणूनच सक्रियपणे काम करू व आपले सर्व उमेदवार निवडून आणू असा संकल्प केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, सचिन पवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर कांगणे, माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, रामचंद्र आईनकर, शांताराम म्हसकर, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, महिला आघाडीच्या सौ. सुप्रिया पवार, तालुका संघटक महेंद्र भोसले, माजी सभापती शांताराम चिनकटे, युवराज गुजर, राजू घाणेकर यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









