खेड(प्रतिनिधी) घरडा केमिकल्स लोटे या कंपनीतर्फे सामाजिक उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येतात. यातीलच एक उपक्रम म्हणजे, कंपनीच्या परिसरातील विविध प्रशालांना शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणे. यावर्षीही घरडा केमिकल्स लोटे यांनी ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल मोरवंडे बोरज शाळेला ई प्रशाला उपक्रमा अंतर्गत पाच ऑल-इन-वन प्रोजेक्टर संगणक भेट दिले.
सदर संगणकांमध्ये सीबीएसई आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा अभ्यासक्रम ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध असल्याने दैनंदिन अध्ययन अध्यापनाचे कार्य प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी मदत होत आहे. सदर संगणकांमध्ये उपलब्ध असलेले इन्टरॅऍक्टिव्ह बोर्ड हे ॲप्लिकेशन गणित, विज्ञान, भूगोल, चित्रकला इत्यादी विविध विषयांमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या आकृत्या काढण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, इतर सर्व संस्था सदस्य आणि प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे यांनी घरडा केमिकल्स लोटे येथील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.









