राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते शशिभाई अमरे यांचे निधन

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहरातील तालीमखाना गुरववाडी येथील रहिवाशी, सामाजिक कार्यकर्ते व जय महाराष्ट्र क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत दत्ताराम अमरे (६२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

काही दिवसापुर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथून अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूरात हलविण्यात आले होते. मात्र कोल्हापूरात उपचार सुरू असतानाच गुरूवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

एक शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तीमत्व असलेले शशिकांत अमरे हे शशिभाई या नावाने ते सर्वत्र परिचित होते. क्रिडा प्रेमी असलेल्या शशिभाई यांनी जय महाराष्ट्र क्रिडा मंडळाच्या माध्यमातुन राजापुरात गेली सलग ३० वर्षापेक्षा अधिक काळ कब्बडी स्पर्धांचे आयोजन करून स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. राजापूरातील सामाजिक कार्यात त्यांचा कायमच सक्रीय सहभाग असे, गेली कित्येक वर्षे ते राजापूर आगारातील एसटी उपहार गृह चालवत होते. या ठिकाणीही त्यांनी अनेकांना रोजगार देताना अनेक गरीब व गरजूंना अन्नदान करत व मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपसली होती. गोरगरीबांचा कैवारी म्हणूनच ओळखले जात होते. सामाजिक, क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या शशिभाई अमरे यांचे सर्व राजकिय पक्षांमधील लोकांशी मित्रत्वाचे संबध होते, एक अजातशत्रू व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती.

त्यांच्या निधनाचे वृत कळताच राजापूर शहर व तालुका परिरसरातील विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक, एसटीचे कर्मचारी यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली व अमरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, आई, तीन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.