Kankavali | कनेडी राड्यातील पाच जणांना पोलीस कोठडी 

Google search engine
Google search engine

 

कणकवली : कनेडी येथे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडाप्रकरणी सध्या भा. दं. वि. कलम ३०७ च्या गुन्हयांतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांपैकी चौघांना कणकवली पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५३ च्या गुन्ह्यांतर्गत सोमवारी अटक केली. तर ३५३ च्या गुन्ह्यांतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाला ३०७ च्या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली. या पाचही संशयितांना मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

कनेडी येथील राड्या अंतर्गत भा. दं. वि. कलम ३५३ व अन्य कलमांतर्गत अटक केलेल्या आरोपींमध्ये भाजपचे श्रीकांत उर्फ कांता नारायण सावंत ( ५०, भिरवंडे – बिवणेवाडी ), राजेश मधुकर पवार ( ५१, दिगवळे – करंबळीवाडी ), निखिल प्रकाश आचरेकर (३९, कणकवली – मारुतीआळी) व शिवसेनेचे मंगेश रामचंद्र सावंत ( ४८, भिरवंडे- पुनाळवाडी ) यांचा समावेश आहे.

तर भा. दं. वि. कलम ३०७ व अन्य कलमांतर्गत संदीप बाळकृष्ण गावकर ( ३२, सांगवे – गावकरवाडी ) याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा मोबाईल गहाळ झाला आहे. त्याचा शोध घेणे व अन्य कारणांसाठी संदीप गावकर याच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.