रत्नागिरी पर्यटन संस्थेतर्फे पाचवी शाश्वत पर्यटन परिषद

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : गोव्याची सर्व अर्थव्यवस्था समुद्र आधारित पर्यटनावर चालते. रत्नागिरी जिल्ह्यातील विशाल व अथांग समुद्रकिनारे लाभले आहेत. मग येथेसुद्धा त्यावर आधारित शाश्वत पर्यटनातून विकास साधता येईल. या विषयावरच रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने पाचवी रत्नागिरी जिल्हा शाश्वत पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

रत्नागिरीत सागरी पर्यटनातून जागतिक पर्यटकांना कसे आकर्षित करता येईल, कोकणातील ग्रामीण लोककलेला वाव देणे व कोकणातील खाद्यपदार्थांची पर्यटकांमध्ये रुची निर्माण करणे आणि स्थानिकांमध्ये पर्यटनाविषयी जनजागृती करणे हा या परिषदेचा विषय आहे. सागरी पर्यटनाच्या माध्यमातून समुद्रकिनारे चांगल्या प्रकारे कसे विकसित करता येतील व तेथे पायाभूत सुविधा देता येतील आणि जो सागरी महामार्ग होणार आहे, त्या महामार्गाच्या बाजूला असणारी सर्व गावे पर्यटनामध्ये कशी येतील. तेथील स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून कसा रोजगार निर्माण होईल याबाबत परिषदेत चर्चा, परिसंवाद होणार आहेत.

कोकणातील प्रमुख लोककला, खेळे नमन, जाखडी, ढोलवादन, पालखी नृत्य या कलेला पर्यटकांच्या माध्यमातून प्रमुख पर्यटन स्थळांवर कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करुन देण्याची पर्यटन संस्थेने मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील लोक कलाकारांना या माध्यमातून रोजगार निर्माण होईल. कोकणातील खाद्यपदार्थांचे बचत गटांच्या माध्यमातून स्टॉल लावून सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांना उपलब्ध करुन देता येईल व त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

अनेक पायाभूत सोयीसुविधा ही शासनामार्फत मिळत आहे. त्यामुळे देशविदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्हयाकडे वळू लागले आहेत व रत्नागिरी जिल्हयाकडे बघण्याचे वेगळे आकर्षण निर्माण झाले आहे. यामध्ये इतर अनेक ट्रेनिंग कार्यक्रम प्रामुख्याने टुरिस्ट गाईड प्रोग्राम तसेच विविध बँकांच्या माध्यमातून स्थानिकांना व्यवसाय उभारण्याकरिता कर्जासाठी मार्गदर्शन करणे तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध योजनांसाठी शासकिय पातळीवर पाठपुरावा करुन योजना मिळवून देणे.

या परिषदेस उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, आमदार, खासदार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, सिंधुरत्न योजना सदस्य प्रमोद जठार आणि किरण सामंत, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, कोकण विभागचे हणमंत हेडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माजी खासदार नीलेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, उद्योजक संजय सुर्यवंशी, संजय यादवराव, डॉ. श्रीधर ठाकूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश कीर, संतोष कामेरकर, विणा वर्ल्ड ट्रॅव्हल्सचे सुधीर पाटील जिल्ह्यातील आमदार, खासदार व इतर संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. जास्तीत जास्त पर्यटनप्रेमी, होम स्टे, हॉटेल व्यावसायिक व संस्था चालक यांनी परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन राजू भाटलेकर यांनी केले आहे.