सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी उमाकांत वारंग यांची बिनविरोध निवड

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी येथील प्रतिष्ठित ‘सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित’ या संस्थेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. यामध्ये संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व संचालक उमाकांत सदाशिव वारंग यांची सर्वानुमते आणि बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

​ ​निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सावंतवाडी सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली पतपेढीच्या कार्यालयीन दालनात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष पदासाठी उमाकांत वारंग यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. विहित मुदतीत अन्य कोणताही अर्ज न आल्याने आणि वारंग यांनी माघार न घेतल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कदम यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

​ ​नवनिर्वाचित उपाध्यक्ष उमाकांत वारंग हे केवळ सहकार क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उभारणीत आणि आजवरच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

​या निवड बैठकीस संस्थेचे ज्येष्ठ संचालक दत्ताराम सावंत, चेअरमन रमेश बोंद्रे, श्रीमती सीमा मठकर, श्रीमती वैष्णवी बांदेकर, श्रीमती किशोरी कुडतरकर, श्रीमती मनीषा मिशाळ, देवेंद्र तुळसकर, वाय. पी. नाईक, चंद्रकांत शिरोडकर, शरद सावंत, सदानंद जाधव यांसह अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

​अभिनंदनाचा वर्षाव
​उमाकांत वारंग यांच्या निवडीबद्दल सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब, पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
​
जबाबदारी निष्ठेने पार पाडणार : उमाकांत वारंग
​निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना उमाकांत वारंग म्हणाले, “संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. संस्थेचा कारभार सहकार नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने चालवण्यावर माझा भर असेल. कायद्याच्या चौकटीत राहून पतपेढीचा आर्थिक उत्कर्ष कसा साधता येईल, यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
​