
रत्नागिरी : भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीद्वारे तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून आज दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात आंतरशालेय प्रश्नमंजुशेचे आयोजन केले.
भारतीय तटरक्षक दल हे 01 फेब्रुवारी 2024 रोजी आपला 48 वा वर्धापन दिन साजरे करत आहे. या दिनाच्या अनुषंगाने तटरक्षक दल विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून आयोजित या आंतरशालेय प्रश्नमंजुशेमध्ये रत्नागिरी शहरातील पोदार इंग्लिश स्कूल, नवनिर्माण हाय, माने इंग्लिश स्कूल, सर्वंकष विद्यामंदिर, नाईक विद्यालय आणि इकरा इंग्लिश स्कूलच्या प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या रोमांचक स्पर्धेत कु अभिराज प्रभाकर कांबळे व कुमारी शौर्या कांबळे यांनी माने इंग्लिश स्कूलच्या वतीने सहभाग घेत प्रथम परितोषिकावर आपले नाव कोरले तर कु अन्वेष माथ्युस व कु चिन्मय पारकर यांनी सर्वंकष विद्यामंदिरच्या वतीने द्वितीय परितोषिक पटकावले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक समादेशक फेरा टीपी आणि सहायक समादेशक रोहित शर्मा यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक प्रा डॉ किशोर सुकटनकर हे सपत्नीक उपस्थित होते तर गद्रे मरीन्स कंपनीचे प्रमुख श्री दीपक गद्रे, शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती फरीदा काझी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत हे रत्नागिरी शहरातील सन्माननीय व्यक्ति निमंत्रित अथिति म्हणून उपस्थित होते. सर्वंकष विद्यामंदिरच्या प्रिन्सिपल श्रीमती मोनिका जयस्वाल आणि नाईक विद्यालयाचे श्री अश्फाक मुश्ताक नाईक हे देखील या कार्यक्रमास हजर होते. विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक तसेच तटरक्षक दलाचे जवान असे एकूण 120 प्रेक्षक यावेळी हजर होते.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रा डॉ सुखटणकर म्हणाले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृध्दिंगत होते आणि त्यांच्यात स्पर्धात्मक भावना जोपासली जाते. भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमान अधिकारी उपमहानिरीक्षक शत्रूजित सिंग यांनी या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांना सैन्य दलाच्या कार्यप्रणालीची जवळून ओळख करून देणे, त्यांच्यात सैन्य दलात भरतीसाठी आवड निर्माण करणे आणि राष्ट्रप्रेम जागृत करणे हे आहे असे प्रतिपादन केले.










