स्वच्छ भारत अभियानांतर्गत सावंतवाडीत स्वच्छता मोहिम

महिला बचत गट नगरपरिषद सफाई मित्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग

सावंतवाडी । प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गुरुवारी सावंतवाडी शहरातील दैवज्ञ गणपती मंदिर , नरसोबा मंदिर, विठ्ठल मंदिर बाजारपेठ , विठ्ठल मंदिर भटवाडी , भवानी मंदिर गरड , श्री देव पाटेकर , श्री देव उपरलकर , ईस्वटी महापुरुष मंदिर सबनीसवाडा, हनुमान मंदिर कोर्ट नजिक येथे आज स्वच्छता मोहीम राबविणेत आली. या वेळी मंदिर परिसर व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.


या मोहिमेत महिला बचत गट, नगरपरिषद सफाई मित्र , अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच लायन्स क्लब, इनरव्हील क्लब , समता मंडळ , डॉक्टर्स फॅटरनिटी क्लब यांनीही परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी स्वच्छ तीर्थ मोहीम आयोजित करणेबाबत निर्देश दिलेले होते. यामध्ये सर्व धार्मिक स्थळे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची सखोल स्वच्छता करायाची होती. या पाश्वभूमीवर शहरातील मंदिरानजीकचे नागरिक ही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

तसेच सफाइमित्र यांनी विठ्ठल मंदिर व श्री देव उपरलकर येथे निर्माल्य पासून कंपोस्ट तयार करुन “3R” तत्त्वांचे पालन करणेसाठी व टाकाऊ पासून संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ जानेवारी रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सखोल स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Campaign) राबविणेबाबत निर्देश दिलेले होते. सदर प्राप्त निर्देशानुसार गुरुवारी सावंतवाडी शहरात हेल्थ फार्म ते शिल्पग्राम ह्या परिसरात सखोल स्वच्छता मोहीम सकाळी ७ वाजता घेण्यात आली.


सदर मोहिमेअंतर्गत हेल्थ फार्म व शिल्पग्राम परिसरातील सर्व रस्ते, नाले, फूटपाथ या ठिकाणी साफसफाई करण्यात आली. सदर मोहिमेत सावंतवाडी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी व सफाई मित्र सहभागी झाले होते. तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी यांनी ह्या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.तसेच शिल्पग्राम परिसरातील रहिवाशी देखील ह्या मोहिमेत सहभागी झाले होते.

ही मोहीम यशस्वी करणेसाठी प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे, दीपक म्हापसेकर, सर्व अधिकारी कर्मचारी व सफाइमित्र यांनी विशेष परिश्रम घेतले. अशाप्रकारे उत्स्फूर्तेने स्वच्छता मोहीम राबविलेने शहरात स्वच्छताविषयक जनजागृती व प्रत्यक्ष कार्यातून संदेश दिल्याबद्दल मुख्याधिकारी सागर साळुंखे व प्रशासक प्रशांत पानवेकर यांनी सर्वाचे सहकार्याबद्दल आभार मानले.