जमीन जागेच्या वादातून जेसीबीद्वारे घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराची नासधूस

कोचरी बेंद्रेवाडी येथील घटना , चौघांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 लांजा (प्रतिनिधी) जमीन जागेच्या वादातून जेसीबीच्या सहाय्याने घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे नुकसान आणि नासधूस केल्याची घटना तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथे आज शुक्रवारी १९ जानेवारी रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी येथील तिघांसह जेसीबी चालक अशा एकूण चौघांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी वसंत बेंद्रे (वय ६१ राहणार कोचरी बेंद्रेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोचरी बेंद्रेवाडी येथील वसंत बेंद्रे आणि मच्छिंद्र महेंद्र कांबळे हे एकमेकांशी शेजारी राहणारे असून त्यांच्यात जमीन जागेवरून वाद निर्माण झालेला आहे .आज शुक्रवारी १९ जानेवारी रोजी फिर्यादी वसंत बेंद्रे हे कार्यकारी दंडाधिकारी लांजा येथे आले असताना यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे, सौ. दया शंकर कांबळे, दीप्ती महेंद्र कांबळे यांनी जमीन जागेच्या वादाच्या कारणावरून संगनमताने वसंत बेंद्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी सौ प्रतीक्षा वसंत बेंद्रे हिला शिवीगाळ करत हात धरून घरातून बाहेर काढले. आणि घरात घुसलीस तर तुझे इथेच काम करून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी आणलेल्या जेसीबी (क्रमांक केए २८- एमए- ३१०१) या जेसीबी द्वारे वसंत बेंद्रे यांच्या घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

या प्रकरणी वसंत बेंद्रे यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार एस. एस .भुजबळराव हे करत आहेत.