खेड मध्ये १० दिवसांत आठ दारूधंद्यांवरील धाडीत लाखोंचा ऐवज जप्त

 
 
 खेड(प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या १० दिवसात ८ दारूधंद्यांवरील धाडीत पावणे अकरा लाख रूपयांचा ऐवज जप्त केला. ६३ हजार रुपये किमतीची दारू हस्तगत करत ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जप्त केलेल्या ऐवजामध्ये तीन रिक्षांसह पिकअप टेम्पोचाही समावेश आहे.
पोलिसांनी बेकायदेशीरपणे हातभट्टीच्या दारूची विक्री करणाऱ्यांसह वाहतूक करणाऱ्यांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. गावठी हातभट्टीचे दारुअड्डे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचून गावठी दारूसह विक्री करणाऱ्यांना रंगेहाथ पकडत आहेत. पोलिसांच्या कारवाईचा विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यांनी धसका घेतला आहे. तरीही गावठी हातभट्टीच्या दारूसह विदेशी मद्यसाठ्याची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
५ दिवसांपूर्वीच पोलीस पथकाने खेड- भरणे मार्गावर मद्यासह सव्वाचार लाखाचा ऐवज जप्त करत दोघांना रंगेहाथ पकडले होते. १२ हजार ६०० रूपये किंमतीचा देशी- विदेशी मद्यसाठा जप्त केला होता. या पाठोपाठ दस्तुरी येथे २ लाख १५ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला होता. यामध्ये १५ हजार ६०० रुपये किंमतीच्या विदेशी मद्यसाठ्याचा समावेश होता.
या २ मोठ्या कारवाईनंतरही पोलिसांनी खेड-दापोली मार्गावरील चिंचघरनजीकही ४ लाख १२ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्याची कारवाई केली. या कारवाईत १२ हजार ४०० रुपये किंमतीच्या विदेशी मद्यसाठ्यासह ४ लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला. या तीनही ठिकाणी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ६ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या ३ मोठ्या कारवाईनंतरही लोटे, बोरघर, गुणदे येथे गावठी हातभट्टीच्या दारूथंयांवर धाडी टाकत गावठी दारू जप्त केली. शहरातील शिवतररोड येथेही बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारुअड्ड्यावर धाड टाकून ६,७२० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला होता.