चिपळूण (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गट आणि कसबा पंचायत समिती गणातील मुंबईकरांचा मेळावा दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता दादर येथील महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
आमदार निकम यांनी संगमेश्वर तालुक्यात गावागांवातील विकासकामांसाठी मोठया प्रमाणा निधी वितरीत केल्याने तालुक्यातील विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे गावागावात झालेल्या विकासकामांचा आढावा आणि सद्यस्थितीत सुरू असलेली तसेच मंजूर असलेली विकासकामे आणि प्रस्तावित कामांसदर्भात मुंबईकर ग्रामस्थांशी चर्चा करण्याच्यादृष्टीने आमदार निकम यांनी गेल्या गणेशोत्सवानंतर मुंबईत प्रत्येक जिल्हा परिषद गटा मेळावा घेण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यत ओझरे खुर्द, कडवई, मुचरी, धामापूर या जिल्हा परिषद गटांचे मेळावा विराट गर्दीत झाल्यानंतर आता कोसूंब जिल्हा परिषद गट आणि मतदारसंघात समाविष्ठ असलेला कसबा पंचायत समिती गणातील मुंबईकरांचा मेळावा रविवारी दादर येथे होत आहे. कोसुंब जिल्हा परिषद गट आणि कसबा पंचायत समिती गणात आमदार निकम यांच्या माध्यमातून सुमारे ९० कोटीहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रविवारच्या मेळाव्यात या गट आणि गणातील प्रत्येक गावातील विकासकामांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी आमदार शेखर निकम हे मार्गदर्शन करणार असून राष्ठ्रवादीचे मुंबई शहर अध्यक्ष समीर भुजबळ व प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्याला मुंबईकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










