सावर्डे विद्यालयात आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास मार्गदर्शन
चिपळूण (प्रतिनिधी) : आधुनिक युगात सर्व व्यवहार डिजिटल झालेले आहेत. यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थी आर्थिक साक्षर असणे आवश्यक आहे तरच आर्थिक फसवणूक होणार नाही. प्रत्येकाने याबाबतीत साक्षर होऊन फसवणुकीला प्रतिबंध करावा, असे आवाहन सावर्डे एसबीआयच्या शाखा व्यवस्थापक हेमलता ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना केले.
सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास या विषयावर हेमलता ठोंबरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विचारमंचावर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, एमसीव्हीसी बँकिंगचे प्रमुख हनुमंत घाडगे व संदीप पवार, सहाय्यक शिक्षक मनोज कुलकर्णी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजनाचे महत्व, विविध प्रकारची गुंतवणूक व त्याचे फायदे तोटे या विषयावर विस्तृत माहिती देण्यात आली. आर्थिक व्यवहारांकरिता वापरण्यात येणारी आधुनिक साधने उदाहरणार्थ नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस वापराचे फायदे व त्यांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन तज्ञ मार्गदर्शिका श्रीमती हेमलता ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले.












