जीआयटीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा

चिपळूण (प्रतिनिधी) : घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रवेशित प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि. १५ सप्टेंबर या “अभियांत्रिकी दिना” दिवशी अतिशय उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नावाजलेले शिक्षण तज्ञ आणि या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. अनंत मराठे यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात जीआयटी समूहगान गाऊन झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये मागील वर्षी मेरिटनुसार पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. कु. श्रावणी देसाई (प्रथम क्रमांक) कु. प्रांजल शिंदे (द्वितीय क्रमांक)आणि साद जुवळे (तृतीय क्रमांक) यांना अनुक्रमे रोख रुपये ५०००, ४००० आणि ३००० बक्षीस देण्यात आले. प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. एम एस सातपुते यांनी यानिमित्ताने सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागांमध्ये स्वागत केले. तसेच त्यांच्यासाठी लागू असलेली मुंबई विद्यापीठाची टीचिंग स्कीम त्यांनी थोडक्यात स्पष्ट केली. यानंतर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन कोळेकर यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ आणि त्यामधील विद्यार्थी केंद्रित तरतुदी याविषयी भाष्य केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या महत्त्वाच्या सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे महत्त्वाचे उपक्रम यांची थोडक्यात माहिती सांगून विद्यार्थ्यांना या सर्व सोयी सुविधा तसेच उपक्रमांचा लाभ घेण्याची सूचना केली. समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनंत मराठे यांनी आपल्या भाषणामध्ये कै. डॉ. घरडा यांचे स्मरण करून त्यांच्या कार्याची महती आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा धडा यापासून आपल्या भाषणाची सुरुवात केली. आपल्या भाषणामध्ये पुढे त्यांनी जगभरात सुरू असणाऱ्या अनेक घटनांचा संदर्भ देऊन यामध्ये अभियंत्यांची भूमिका काय असली पाहिजे यावरती भाष्य केले. याचबरोबर १५ सप्टेंबर हा अभियंता दिन असल्याने जागतिक दर्जाचे भारतीय अभियंते कै. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे स्मरण करून आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या सहभागाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना समाजाभिमुख बनवण्याचे सूचना केली. आणि समाजातील प्रत्येक समस्येवरती आपण अभियंता म्हणून एखादा तोडगा काढू शकतो का याचा विचार करून त्या पद्धतीने वाटचाल करण्याची देखील सूचना केली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पोतदार यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. होवाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा केला. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. नितीन कोळेकर यांनी केले तसेच विभागप्रमुख डॉ. सातपुते तसेच प्राचार्य डॉ पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.