परुळे | प्रतिनिधी : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत शाळांमधून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्यासाठी व त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून कुक्कुटपालन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कोंबडीच्या पिल्लांचे वाटप करण्यात आले. या कावेरी जातीच्या कोंबड्या असून त्यांची साधारण १८० अंडी देण्याची क्षमता आहे. राधारंग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ५०% अनुदान या तत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याला पाच कोंबडीच्या पिल्लांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कोंबडीच्या पिल्लांचा पुरवठा करणारे व्यावसायिक श्री. मधुसुदन कांदे यांनी कुक्कुटपालन कसे करावे, पिल्लांची काळजी कशी घ्यावी, अधिकाधिक आर्थिक लाभ कसा मिळवावा याविषयी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देसाई, संस्था सीईओ श्री. अमेय देसाई, राधारंग फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. अरुणा सामंत, मुख्याध्यापक सचिन माने, पालक शिक्षक संघाचे सहसचिव सुमन राणे उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांमधून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.












