आंबा घाटातील दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या

एकजण अजुनही फरार; पोलीसांकडून शोध सुरू

निलेश जाधव / देवरूख

आंबा घाटातील दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी आज शुक्रवारी आणखी दोघांच्या रत्नागिरीतून मुसक्या आवळल्या आहेत. तर उर्वरित एकाचा शोध पोलीसांकडून घेतला जात आहे़. या दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी गुन्हा घडल्याच्या काही तासातच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आठपैकी पाच आरोपींना गजाआड केले होते. त्यांचे इतर तीन साथीदार फरार होते. शुक्रवारी त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. अरबाज मजीद बांगी (वय-३१, रा. मजगांव,रत्नागिरी), शार्दूल सुनील किर (वय-२४, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना देवरूख न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही एकजण फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.