ग्रामपंचायतीसह प्रशासकीय यंत्रणांचा नागरिकांच्या जीविताशी खेळ कायमच

खेड (प्रतिनिधी) खेड – भरणे मार्गावरील तालुका कृषी रोपवाटिका कार्यालयासमोरील रस्त्यालगत घाटमाथ्यावरून आलेल्या मिरची व्यावसायिकांनी सलग  दुसऱ्या दिवशी बस्तान ठोकले होते. मंगळवारी  स्वस्तातील मिरची खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
 यासाठी अनेकांचे वाहने स्वस्तातील मिरची खरेदीसाठी अचानक त्या ठिकाणी थबकत होती. यामुळे अनेकांना स्वत:चा जीव नव्हे तर स्वस्तातील मिरची महत्वाची वाटत असल्याचे निदर्शनास आले. त्याहीपेक्षा कहर म्हणजे भरणे ग्रामपंचायतीने  कारवाईसाठी कुठलीच ठोस पावले न उचलल्याने व्यावसायिकांचे चांगलेच फावले.
एकप्रकारे  ग्रामपंचायतीसह प्रशासकीय यंत्रणांचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीविताशी सुरू असलेला खेळ कायमच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या व्यावसायिकांना ग्रामपंचायतीसह प्रशासकीय यंत्रणांचा वरदहस्त कशासाठी, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.