खेड तालुक्यात लाभार्थ्यांवर प्रतिमहा ८५ लाख ४१ हजार खर्च
खेड(प्रतिनिधी)
केंद्र व राज्य शासनाची संजय गांधी निराधार योजना तालुक्यातील ५ हजार ९८३ निराधार लाभार्थ्यांसाठी आधारवडचं ठरली आहे. या लाभार्थ्यांवर केंद्र व राज्य सरकारकडून प्रतिमहा ८५ लाख ४१ हजार ४०० रूपये इतका खर्च करण्यात आला आहे: महागाईच्या कहरात हे आर्थिक सहाय्य तुटपुंजेच ठरत असले तरी निराधारांसाठी मदतीचा ‘आधारवड’ ठरत आहे. शासनाची मदत मिळवण्यासाठी दरवर्षी लाभार्थ्यांची वृद्धी होत असून इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब योजनेचे ११ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या ६ योजनांद्वारे तालुक्यातील ५ हजार ९८३ लाभार्थी लाभ घेत आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ३१९५ लाभार्थी असून त्याकरिता प्रतिमहा ४७ लाख ९२ हजार ५०० रूपये खर्च होत आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे २०९५ लाभार्थी असून याकरिता ३१ लाख ४२ हजार ५०० रूपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ६४० लाभार्थी असून त्याकरिता १५ लाख ७१ हजार रूपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे २७ लाभार्थी असून त्यांच्यावर ८१ हजार रूपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे ४ लाभार्थी असून याकरिता १२०० रूपये खर्च करण्यात येत आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक लाभ देण्यात येत नसून एकाच वेळी धनादेशाद्वारे २० हजार रूपयांची मदत दिली जात आहे. यामध्ये २२ लाभार्थी असून त्याकरिता आतापर्यंत ४ लाख ४० हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. उर्वरित ११ प्रकरणे प्रलंबित असून लवकरच या लाभार्थ्यांना देखील लाभ मिळणार आहे.
या योजनांद्वारे शासनाची आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने या योजना निराधारांसाठी आधारच ठरत आहेत.
शासनाच्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील निराधार पुढे येत आहेत.
संजय गांधी निराधार योजना समितीचे सचिव तथा तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून म्हणून एस. एस. मद्रे, यशोदा गागुर्डे, मयुरी सुतार, अंजना गायकवाड आदी योजना निराधार कुटुंबियांपर्यंत पोहचवून त्यांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.












