शिरगाव येथील जागरूक ग्रामस्थांची सतर्कता
शिरगांव ( वार्ताहर) मालवण येथील ज्वेलर्स शॉपमधून दागिने घेण्याच्या बहाण्याने सोमवारी चोरी करून पसार झालेल्या तीन संशयित महिलांना शिरगाव येथील जागरूक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शिरगाव बाजारपेठेत संशयितरित्या वावरताना आढळल्या असता त्याना मंगळवारी दुपारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या.
मालवण येथील एका ज्वेलर्स शॉपमध्ये दागिने घेण्याच्या बहाण्याने येऊन दोन ग्रॅम सोन्याची डवली चोरून तीन महिला पसार झालेल्या आहेत. या महिला कोठेही आढळून आल्यास तत्काळ संपर्क साधावा, असा व्हिडीओ संदेश शिरगाव पोलिस पाटील चंद्रशेखर साटम यांनी शिरगाव येथील अनेक व्हॉट्सअँप ग्रुपवर मंगळवारी सकाळी टाकला होता.व गावातील ग्रामस्थांना सावध केले होते.
हा व्हाॅटसअँप संदेश देवगड तालुका व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर साटम, भाजपाचे शिरगाव विभागीय अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, गणेश पवार यांनी पाहिला होता. त्यांना त्या व्हिडीओमधील तिन्ही महिला शिरगाव बाजारपेठत लहान मुलासह संशयितरित्या फिरताना आढळून आल्याने त्यांनी तत्काळ पोलिस पाटील चंद्रशेखर साटम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही बाब देवगड पोलिस ठाणेला कळविली.
दुपारी देवगड पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी जाधव, पोलिस हवालदार राजन जाधव, शिरगाव पोलिस दूरक्षेत्र अंमलदार महेंद्र महाडिक, पोलिस कॉन्स्टेबल विशाल वैजल, महिला पोलिस हवालदार अन्वीता कदम यांनी शिरगाव बसस्थानक आवारातून तीन संशयित महिलांना ताब्यात घेतले. सोने चोरीचा गुन्हा मालवण तालुक्यात घडल्याने अधिक तपासासाठी या संशयित महिलांना मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस पाटील यांनी टाकलेला तो व्हिडीओ मॅसेजची जागरूक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ दखल घेतली.
यामुळे या सर्वांचे अभिनंदन होत आहे.











