सावंतवाडी | वादग्रस्त व्हायरल पोस्ट प्रकरणी एकूण पाच जण ताब्यात : गुन्हा दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी :

धार्मिक भावना दुखावणारी वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी सावंतवाडी शहरातील एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून रात्री उशिरा यातील तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. कामरान आयुब संगत्राश (१८ वर्षे, रा. बाहेरचा वाडा सावंतवाडी ), समरीन जहिर खान बिजली ( १९, रा. बाहेरचा वाडा ), लबिबा कादर खान ( २१, रा. बाहेरचा वाडा ) अशी त्यांची नावे असून यात अन्य दोघांचा समावेश आहे.

सोशल मिडीयावर हिंदू धर्मीयांची भावना दुखावणारी वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे सावंतवाडीत मंगळवारपासून प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी दुपारी काही हिंदू बांधवांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत या व्हायरल पोस्ट प्रकरणी संबंधित युवकाला व त्याच्या सह अन्य काही जणांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी यातील कामरान संगत्राश याला ताब्यात घेण्यात आले होते.

त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा पुन्हा एकदा हिंदू धर्मीय मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले रात्री उशिरापर्यंत त्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. या प्रकरणातील सर्वांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह शेकडो युवक तसेच विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते.

बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पोलीस ठाणे गाठत हिंदू बांधवांनी संबंधितांच्या अटकेची मागणी लावून धरली. त्यानंतर बुधवारी दुपारी यातील एका युवतीला ताब्यात घेण्यात आले तर त्यानंतर दिवसभरात अन्य तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांवर दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, बुधवारी दुपारी ४ च्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भेट देत या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरासह तालुक्यात शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या सूचना केल्या. यावेळी सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, दोडामार्ग पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित असलेल्या जमावाशी संवाद साधत सामाजिक शांतता व जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले. कोणीही कायदा हातात घेऊ नये पोलीस प्रामाणिकपणे आपले काम करीत आहेत. याप्रकरणी दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल अशा प्रकारची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

जातीय सलोखा व सामाजिक शांतता राखा : पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी

सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सर्वांनी जातीय सलोखा व सामाजिक शांतता राखावी, कोणत्याही समाजाच्या व्यक्तीने कायदा हातात घेऊ नये सोशल मीडियावर कोणत्याही वादग्रस्त पोस्ट व्हायरल करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही अफवा पसरवू नये, अशा प्रकारचे आवाहन केले आहे.