सावंतवाडी । प्रतिनिधी : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सावंतवाडी शहरातील एका युवकासह दोन युवतींची २७ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता या तिघांचीही प्रत्येकी २५ हजारांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी सावंतवाडी शहरातील एकूण पाच जणांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर यातील कामरान आयुब संगत्राश (१८ वर्षे, रा. बाहेरचा वाडा सावंतवाडी ) या युवकासह समरीन जहिर खान बिजली ( १९, रा. बाहेरचा वाडा ), लबिबा कादर खान ( २१, रा. बाहेरचा वाडा ) या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने या तिघांनाही २७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची वैयक्तिक २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयितातर्फे ॲड. गौरी संग्राम देसाई, ॲड. समी ख्वाजा व ॲड. अश्पाक शेख यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयाने वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून तिघा संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तिघांना जामीन मिळावा, यासाठी वकिलांनी अर्ज दाखल केला. सदरचे अर्ज न्यायालयाने मंजूर करून प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.











