रत्नागिरी : शहर परिसरात राहणारे इसम नामे श्री. मनीष कांतीलाल जैन (वय 41 वर्षे रा. जैन कॉलनी शेजारी थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) हे दिनांक २६/०१/२०२४ रोजी सकाळी 10.00 वा च्या सुमारास आपल्या नाकोडा ज्वेलर्स हे दुकान उघडण्यासाठी घरातून निघाले. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या पर्समध्ये दुकानाच्या चाव्या व सुमारे दहा तोळे सोने (मंगळसूत्र व बांगड्या) असे कुठेतरी गहाळ झाले म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली होती.
सदर तक्रार प्राप्त होताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश तोरस्कार यांनी पोना पंकज पडेलकर यांना सदर पर्सचा शोध घेणे कामी पाचारण करण्यात आले. पोना पंकज पडेलकर यांनी शहरांमधील असणाऱ्या सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता सदरची पर्स उचलणारे इसम नामे विशाल विठ्ठल मालवदे, (रा. कोळंबे) यांची चौकशी करुन हरवलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करुन सदरची पर्स मधील चाव्या व सर्व दागिने श्री. मनीष कांतीलाल जैन यांना पोलीस निरीक्षक महेश तोरस्कार यांच्या हस्ते रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे सुखरूप ताब्यात देण्यात आले आहेत.












