तब्बल ४५० रूग्णांनी घेतला लाभ
राजापूर | प्रतिनिधी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सुन्नी दावते ईस्लामी शाखा राजापूर व कोकणी डॉक्टर्स असोसिएशन (KDA) च्या संयुक्त विद्यमाने राजापूरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरात विविध प्रकारच्या सुमारे ४५० रूग्णांनी लाभ घेतला.
शहरातील बक्करशेठ उर्दू शाळा इमारतीत रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबीर पार पडले. कुराण तिलावते पठणाने या शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी सुन्नी दावते ईस्लामीचे प्रमुख रिजवान खान यांनी या शिबीराचा हेतु स्पष्ट करून कोकणातील सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी आंम्ही हा प्रयत्न केल्याचे नमुद केले. तर यावेळी त्यांनी या शिबीरासाठी मुंबईतुन आलेल्या सर्व तज्ञ डॉक्टरांचा परिचय करून देत या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या शिबीरात कोकणी डॉक्टर्स असोसिएशन (KDA) चे अनेक तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. त्यामध्ये स्त्री रोग तज्ञ, हाडांचे, डोळयांचे, त्वचा रोग तज्ञ, मधूमेह, ह्दय रोग, फीजोथिअरपी तज्ञ यांचा समावेश होता.
सुन्नी दावते ईस्लामी शाखा राजापूर व कोकणी डॉक्टर्स असोसिएशन (KDA) यांच्या वतीने करण्यात आलेल्या या शिबीराच्या यशस्वीततेसाठी सुन्नी दावते ईस्लामी शाखा राजापूरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.










