सरकारने हापूस आंब्याचा दर्जा ठरवून हमीभाव जाहीर करावा!

आंबा व्यवसायिकांच्या समस्या जाणून कार्यवाही करावी : सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यवसायिक सहकारी संघ यांच्या वतीने तहसीलदाराना निवेदन

अमित खोत | मालवण : सरकारने हापूस आंब्याला त्याचा दर्जा ठरवून हमीभाव जाहीर करावा, तसेच कॅनिंग साठी दिल्या जाणाऱ्या आंब्यालाही हमीभाव जाहीर करावा. यासह आंबा व्यवसायिकांच्या समस्या जाणून घेऊन कार्यवाही करावी. यासह विविध मागण्या सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यवसायिक सहकारी संघ मर्यादित सिधुदुर्ग यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

 

यावेळी अध्यक्ष संजय नरे, जगदीश गावकर, सौगंधराज बादेकर, अनिकेत फाटक, नागेश चव्हाण, रमेश गावकर, किशोर पवार, बाळा सामंत, रत्नाकर कोळंबकर, संदेश मालवणकर, विजय फाटक, संदीप कोळगे, नाना सामंत, दाजी हडकर, आप्पा चव्हाण उपस्थित होते.

 

अवकाळी पाऊस आणि खराब हवामान यामुळे नुकसान झालेल्या आंबा पिकांचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. कृपया त्यावर लवकरात लवकर कार्यवाही होऊन नुकसान भरपाई मिळावी. कृषी विभागाने वेळोवेळी उद्भवणा-या नैसर्गिक समस्यावर कोणती व किती प्रमाणात कीटकनाशक फवारणी करावी यासाठी कार्यशाळांचे आयोजन करावे. सरकारने हापूस आंब्याला त्याचा दर्जा ठरवून हमीभाव जाहीर करावा, तसेच कॅनिंग साठी दिल्या जाणाऱ्या आंब्यालाही हमीभाव जाहीर करावा. वरील समस्यां मागण्यावर शासन प्रशासनान स्तरावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे.