श्री कात्रादेवीचा वार्षिक यात्रौत्सव शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील प्रसिध्द आणि सर्वात मोठी यात्रा अशी ओळख असलेल्या व समस्त महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या सागवे येथील श्री कात्रादेवीचा वार्षिक यात्रोत्सव शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.

या यात्रेची जय्यत तयारी सध्या ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आली असून राजापूर, देवगड व विजयदुर्ग आगारातून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना ने आण करण्यासाठी खास यात्रा स्पेशल गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा अशी श्री कात्रादेवीच्या यात्रेची ओळख आहे: संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यात्रा काळात दर्शनासाठी भाविक कात्रादेवीत येत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर अगोदरच या यात्रेची तयारी हाती घेण्यात आली आहे.
येणाऱ्या भाविकांच्या सेवा सुविधांबरोबरच यात्रेत येणारे व्यावसायिक यांना दुकान गाळे व योग्य बोगा उपलब्ध करून देणे, जागेची सफाई करणे, रस्त्यांची सफाई व डागजुगी आणि सुशोभिकरण करणे, यात्रास्थळी येणाऱ्या वाहकांची पाकिंग व्यवस्था व वाहतक व्यवस्था करणे यांसारखी कामे ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.