लांजा येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लोकांची कार्यालयावर धडक
भुमिअभिलेखच्या कारभाराचा वाचला पाढा
संतोष कोत्रे | लांजा. -: कार्यालयात येणाऱ्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला तसेच वयोवृद्ध व्यक्तींना नकाशे पोटखराबा आदी कागदपत्रे मिळावीत म्हणून दोन ते तीन महिने वाट पाहणे तसेच सर्वे व इतर कामे देखील वेळेत होत नसल्याने जनतेतून खदखद आणि संताप व्यक्त केला जात असतानाच, लांजा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लांजा येथील भूमी अभिलेख कार्यालयावर धडक देण्यात आली आणि या कार्यालयाच्या कारभाराचा पाढा वाचण्यात आला. दरम्यान भूमी अभिलेख कार्यालयाने आपल्या कारभारात सुधारणा न केल्यास प्रसंगी जनतेसोबत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील राजेश राणे यांनी दिला आहे.
लांजा भूमी अभिलेख कार्यालय हे कायमच वादाच्या दृष्टीने चर्चेत राहिले आहे. या कार्यालयात येणाऱ्या तालुक्यातील जनतेला, वयोवृद्ध नागरिकांना कधीही वेळेत दाखले किंवा नकाशे वेळेत मिळत नाहीत. साध्या साध्या कामांसाठी गोरगरीब जनतेला दहा ते पंधरा वेळा खेपा माराव्या लागतात. एखादा दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर तो दोन ते तीन महिन्यांनी मिळतो. इतकी भयानक अवस्था या ठिकाणी आहे .सर्वेसाठी देखील तारखा मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. यामुळे या कार्यालयाच्या एकूणच अनागोंदी कारभाराबाबत तालुक्यातील जनतेतून प्रचंड नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयावर धडक मारली . यावेळी या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या शशिकांत सावंत खेरवसे, प्रभाकर गुरव, खेरवसे, राजेंद्र लोटणकर तसेच पराडकर आधी ग्रामस्थांनी या भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच वाचला. आपल्याला दाखले मिळवण्यासाठी आपण दहा ते बारा वेळा या ठिकाणी खेपा मारल्या. परंतु आपले काम झाले नाही अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या .यावेळी राजेश राणे यांनी या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना बाबत विचार केली असता या ठिकाणी जवळपास १६ अधिकारी, कर्मचारी यांची आवश्यकता असताना सात ते आठ अधिकारी कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे जनतेच्या कामांचा खोळंबा होत नसल्याची बाब यावेळी पुढे आली आहे. याबद्दल उपस्थित लोकांनी या कार्यालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
दरम्यान याबाबत राजेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त करताना जर गोरगरीब जनतेला अशाप्रकारे कामासाठी खेता माराव्या लागत असतील तर ते योग्य नाही. आणि पुढील पंधरा दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास आपण जनतेसोबत या कार्यालयाला टाळे ठोकू असा देखील इशारा राजेश राणे यांनी दिला आहे.











