वेंगुर्ले : प्रतिनिधी
सातत्याने साहित्य विषयक उपक्रम घेणाऱ्या आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ले चा स्नेहमेळावा वेंगुर्ले येथील साई दरबार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. मागील श्रावण महिन्यात आनंदयात्रीतील कवीनी श्रावणातील पावसावर व निसर्गावर केलेल्या विविध कवितांचे संकलन करून ‘श्रावणधारा आनंदयात्रीच्या’ या लघु काव्य संग्रहाचे प्रकाशन प्रा. पांडुरंग कौलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आनंदयात्री च्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, माजी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर , प्रा. पांडुरंग कौलापुरे, डॉ.संजीव लिंगवत, नाटककार प्रसाद खानोलकर, सातेरी प्रासादिक संघ चे अध्यक्ष राजाराम नाईक, कथाकार प्रदीप केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्या नंतर उपस्थित कवीनी विविध कवितांचे वाचन केले. त्यानंतर झालेल्या अनौपचारिक चर्चेत अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले. साहित्यिकांच्या स्मारकाना भेटी देणे, कथाकथन सत्र व कथा अभिवाचन सत्र घेणे, कथालेखन व ललित लेखनाची दिशा मिळावी म्हणून तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे, साहित्यातील यशस्वी लोकांच्या मुलाखती, चर्चासत्रे ठेवणे असे विविध उपक्रम घेण्याचे ठरले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शैक्षणिक सुकाणू समितीवर निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. आनंद बांदेकर, पीएचडी मिळवल्याबद्दल प्रा.डाॅ.सचिन परूळकर, एम.ए. एज्युकेशन ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल शैलजा परूळकर यांचा तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाऊन पारितोषिके पटकावणाऱ्या ‘ भेरा’ या मालवणी चित्रपटाचे लेखक व अभिनेते प्रसाद खानोलकर यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.पांडुरंग कौलापुरे, वृंदा कांबळी, प्रदीप केळुसकर, प्रसाद खानोलकर, पि. के.कुबल, डाॅ. संजीव लिंगवत, डॉ. सचिन परूळकर इत्यादीनी मार्गदर्शन केले. शेवटी प्रा. डॉ. आनंद बांदेकर यानी आभार मानले.












